पोलीस महासंचालक कार्यालयाने लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्यास नकार दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील महिला कॉन्स्टेबलने आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

बीड जिल्ह्यातील ललिता साळवी (२७) या पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. २००९ मध्ये त्या पोलीस दलात रुजू झाल्या. सध्या त्या माजलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दोन महिन्यांपूर्वी ललिता साळवी यांनी पोलीस अधीक्षकांकडे लिंगबदल शस्त्रक्रियेला परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र हा विषय पोलीस महासंचालकाच्या अंतर्गत येत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मग ललिता पोलीस महासंचालक सतीश माथुर यांना देखील त्यांनी पत्र पाठवले होते. माझ्यात पुरुषी लक्षणं असून, माझ्या शरीरातील बदल मला जाणवू लागलेत. त्यामुळे मला लिंग बदल करण्यास परवानगी द्यावी आणि मला शस्त्रक्रियेसाठी रजा द्यावी, अशी विनंती महासंचालकांकडे केली. लिंगबदल केल्यानंतरही मला सेवेत कायम राहायचे आहे, असे त्यांनी म्हटले होते.

पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ललिता साळवी यांना परवानगी नाकारली होती. लिंग बदल केल्यास ललिता साळवी यांना नोकरी गमवावी लागली असती. यामुळे ललिता यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता. अखेर ललिता साळवी यांनी आता न्यायालयाचे दार ठोठावले आहेत. मुंबई हायकोर्टात ललिता यांनी याचिका दाखल केली असून लिंगबदलासाठी परवानगी द्यावी, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या वादावर तोडगा काढण्याची सूचना केल्याचे समजते. फडणवीस यांनी ललिता साळवी प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घ्यावा, अशी सूचना केल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.