News Flash

‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ उपक्रमात यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम

यवतमाळ जिल्ह्यात महिलांकडून १३ हजार परसबागांची निर्मिती

टाळेबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यानंतर ग्रामीण भागात पोषण आहाराचा प्रश्न बिकट झाला होता. त्यावर पर्याय शोधून गर्भवती महिला, स्तनदा मातांसह लहान व किशोरवयीन मुले, मुलींना आहारातून विविध पोषक मुलद्रव्ये मिळावे यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी पुढाकार घेऊन तब्बल १३ हजार परसबागा निर्माण केल्या. ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ उपक्रमात यवतमाळ जिल्ह्यास राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने महिलांना कष्टाचे फळ मिळाले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), कृतीसंगम अंतर्गत २५ जून ते १५ जुलै या कालावधीत ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला. ग्रामीण भागातील गर्भवती, स्तनदा माता, बालके आणि किशोरवयीन मुली यांना आहारातून विविध मूलद्रव्ये, खनिजे, लोह आणि प्रथिने इत्यादी पोषकतत्वे मिळावे आणि त्यांची शारिरिक व बौद्धिक वाढ व्हावी, म्हणून या मोहिमेंतर्गत पोषण परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात करोनाच्या काळातही ग्रामीण महिलांनी १३ हजार २८७ परसबागांची निर्मिती करुन महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला. वर्धा जिल्ह्याने आठ हजार २८८ परसबागा तयार करून द्वितीय, तर अमरावती जिल्ह्याने सहा हजार २१७ परसबागांची निर्मिती करून तृतीय क्रमांकावर स्थान मिळविले. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये आहार, पोषण व स्वच्छता विषयक कार्यक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता, स्तनदा माता, सहा ते २४ महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित स्वच्छ व जैविक पद्धतीने पिकविलेला ताजा भाजीपाला व फळे आदींचा समावेश व्हावा, याकरीता प्रयत्न केले जात आहेत. सदर मोहिमेत तयार करण्यात आलेल्या परसबागांमुळे ग्रामीण भागातील कुटुंबाना घरच्या घरी भाजीपाला व फळे उपलब्ध झाली, तसेच कुटुंबाचा भाजीपाल्यावरील खर्चातही बचत झाली.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्याला तीन हजार २८० वैयक्तिक व सामूहिक परसबागा विकसित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्याने मात्र १३ हजार २८७ परसबागा विकसित केल्या. राज्याच्या ‘उमेद’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे ‘उमेद’चे जिल्हा अभियान व्यवस्थापक नीरज नखाते, कृतीसंगमचे जिल्हा व्यवस्थापक सुजित क्षिरसागर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 7:30 pm

Web Title: yavatmal district ranks first in the state in my nutrition garden development campaign initiative msr 87
Next Stories
1 यवतमाळ जिल्ह्यात पुसद, दिग्रसमध्ये सात दिवसांची टाळेबंदी
2 सातारा जिल्ह्यात करोनाचे सामूहिक संक्रमण नाही : शंभूराज देसाई
3 करोना चाचण्या कमी केल्याने आपण काय कमावले काय गमावले? फडणवीसांनी दिलं उत्तर
Just Now!
X