अमित देशमुख यांचा आवाज ऐकून शिवसेनेच्या कार्यक्रमात आल्यासारखे वाटत असून तुमचे इकडे काही जमले नाही, तर शिवसेनेत या अशी ऑफरच शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दिली आहे.

पुणे महापालिकेच्यावतीने सहकारनगर येथील राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलमध्ये स्व. विलासराव देशमुख थ्रीडी तारांगण सुरु करण्यात आले असून याचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मनोहर जोशी आणि अमित देशमुख उपस्थित होते. मनोहर जोशी म्हणाले की, माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये शिवसेना पक्षाने अनेक पदावर काम करण्याची संधी दिली. मला कधीच तिकीट मागण्यासाठी खटाटोप करावा लागला नाही. प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम मी केले. त्या निमित्ताने राज्यातील अनेक भागात जाण्याची संधी मिळाली. मात्र आज पुण्यातील कार्यक्रमाला येऊन एक वेगळे समाधान मिळाले, असे त्यांनी सांगितले. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने सुरु झालेल्या तारांगण हॉलचे उद्घाटन करण्याचा मान मिळाला. या प्रकल्पातून नव्या पिढीला दिशा मिळण्यास मदत होणार असून विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित यांचे भाषण ऐकून छान वाटले. त्यांचा आवाज ऐकून हा शिवसेनेचा कार्यक्रम असल्याचे वाटले आणि ते शिवसेनेचे वाटतात, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. तेवढ्यावरच न थांबता मनोहर जोशी यांनी अमित देशमुख यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफरच दिली. इकडे काही जमले नाही. तर शिवसेनेत या, असे मनोहर जोशी यांनी सांगितले.

यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शरद पवार यांनी देखील संबोधित केले. केंद्रीय मंत्रिमंडळात विलासरावांसोबत मी होते. त्या सरकारमध्ये विज्ञानाचा प्रसार वाढवण्याची जबाबदारी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विलासरावांनाकडे सोपवली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.

अमित देशमुख म्हणाले की, ज्या पुण्यात बाबांचे शिक्षण झाले, त्याच शहरात त्यांच्या नावाने तारांगण उभारले गेले. याचा मला अभिमान असून पुढील पिढीला यातून खूप काही शिकता येणार आहे. बाबांचे पुणे हे सर्वात आवडत शहर होते. ते जर गावी नसते आले, तर त्यांची पुण्यातून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली असती, असे त्यांनी नमूद केले.