महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भर चौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने हे कृत्य केले. हिंगणघाट येथे हा प्रकार घडला असून पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी विकी नगराळे याला ताब्यात घेतले आहे.
Maharashtra: A woman teacher set ablaze by a man in Hinganghat area in Wardha. Police Inspector Satyaveer Bhandivar says, “We are trying to ascertain the motive behind the incident and to nab the accused. She has been taken to a hospital in Nagpur”. pic.twitter.com/I3MBEN2gv4
— ANI (@ANI) February 3, 2020
पोलिसांच्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात हा प्रकार घडला असून आरोपी विकी नगराळे याने सकाळी कामावर निघालेल्या तरुणीच्या चेहऱ्यावर पेट्रोल फेकून तिला पेटवून दिले आणि फरार झाला. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे पोलीस निरिक्षक सत्यवीर भांदिवर यांनी सांगितले. पीडित तरुणी ज्या बसने रोज महाविद्यालयात कामावर जात होती त्याच बसने नगराळेही दररोज प्रवास करीत असे. मात्र, आज तो या बसमध्ये नव्हता यावरुन त्याने थंड डोक्याने कट रचून हा प्रकार केला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या घटनेमध्ये पीडित तरुणीचा चेहरा पूर्णतः जळाला असून तिची वाचाही गेली आहे. तसेच तिच्यावर डोळे गमावण्याचीही वेळ येऊ शकते असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. तीन महिन्यांपूर्वीही देखील नगराळेने तिला बसमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे.
दिवसाढवळ्या भर चौकात हा प्रकार घडल्याने तिथल्या नागरिकांनाही याचा धक्का बसला होता. घटना घडल्यानंतर तत्काळ पीडित तरुणीला नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने नंतर तिला नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दिवसाढवळ्या अशी घटना घडल्याने हिंगणघाटच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
