सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

जातीयवाद, धार्मिक कट्टरता अशा आरोपांच्या घेऱ्यात असणारा पक्ष ‘मजलिस-ए-इत्तेहादुल’ मुसलमीन अर्थात एमआयएम. हैदराबादची पाश्र्वभूमी असणारा हा पक्ष मराठवाडय़ात वाढत गेला. त्यांना मिळालेले यश नेहमीच हिंदू मतांमधील फाटाफुटाशी जोडले जाते. टोकदार बोलणारे नेते कधी कोणती भूमिका घेतात, याकडे केवळ महाराष्ट्र नाही तर देशाचे लक्ष लागलेले असते. आम्ही भारतीय आहोत असे म्हणत तर्कशुद्ध मांडणी करताना या पक्षाचे नेते हळूच धार्मिक टोकदार भूमिका घेतात. पण राजकारण करताना आपणही धर्मनिरपेक्ष आहोत असे सांगण्याचा एमआयएमचा प्रयत्न किती यशस्वी होईल? बहुजन वंचित आघाडीबरोबर ‘जय भीम-जय मीम’अशी घोषणा देणारे कार्यकर्ते अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकरांशी बिनसल्यानंतर ‘एमआयएम’ किती जवळ करतील, या प्रश्नांची उत्तरे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ‘लोकसत्ता’ला मुलाखतीत दिली.

* तुमच्या पक्षावर नेहमीच कट्टर धार्मिक भावना जोपासण्याचा आरोप होतो. अ‍ॅड्. असदोद्दीन ओवेसीसह तुमच्या पक्षातील भाषणांचा तिखटपणा जातीय आणि धार्मिकपणा वाढविणारा का असतो?

– २०१४ मध्ये आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासून हे आरोप होतात. पण २०१९ मध्ये आमच्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी २८८ मतदारसंघातून ४०० अर्ज आले होते. त्यातील २८ टक्के अर्ज मुस्लिमांचे नव्हते. तर अनेक जाती-धर्मातील उमेदवारांना आमच्या पक्षाकडून उमेदवारी हवी आहे. आम्ही आता ४४ जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यात १२ जागांवर धनगर, बंजारा, अनुसूचित जाती-जमातीमधील आहेत. त्यामुळे आम्हाला कट्टर म्हणणारे ही वस्तुस्थिती कसे नाकारतील? २०१९ मध्ये औरंगाबादचा खासदार म्हणून निवडून आलो तेव्हा बहुतेकांना कळाले आहे की आम्ही एवढे कट्टर नाहीत. आम्ही तिखट बोलतो खरे. पण आम्हाला बोलू तरी द्या, आमच्या भावना तरी पोहचू द्या.

*  पण अजूनही तुमच्या पक्षाला भाजपची ‘बी टीम’ संबोधले जाते. याबद्दल तुमचे मत काय ?

– काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते गेल्या निवडणुकीमध्ये हे वाक्य नेहमी म्हणायचे. तेव्हा त्याचा रोष आणि रोख अधिक होता. आताही ते म्हणत असतील, पण त्याची धार कमी झाली आहे.

*  तुमच्या पक्षात अंतर्गत गटबाजी वाढलेली दिसते. अनेक नेते थेट आरोप करतात, हे का घडते आहे?

– सर्व पक्षात, आघाडीत मतभेद असतात. आमच्या पक्षात आहेत. महापालिकेमध्ये आमच्या नगरसेवकांमध्ये मतभेद असतात. असे मतभेद असणे आणि ते व्यक्त करण्याची मुभा असणे हे लोकशाहीचे द्योतक नाही का?

* अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकरांबरोबर मतभेद का झाले? ते तर म्हणतात, ओवेसी चांगले आहेत. त्यांच्या भोवतालचे लोक नाहीत. त्यांनी या पूर्वीही खासदार जलील यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी वक्तव्ये केली आहेत, असे का?

– अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी आजही आदर आहे. ते चांगले आहेत. पण त्यांच्या भोवतालचे लोक चांगले नव्हते. ते रा. स्व. संघाशी संबंधित आहेत. त्यातील एक जण तर भाजपमध्ये दाखल झाले. ते जर ओवेसी चांगले आहेत असे म्हणत असतील तर मीसुद्धा तेच म्हणतो. पण मी जर वाईट माणूस असेन तर त्यांनी मी केलेल्या चुका जाहीरपणे सांगव्यात. चूक असेल तर मी जाहीर माफी मागायला तयार आहे. पण काहीच सांगायचे नाही. कोणत्या कारणाने ते नाराज आहेत तेच कळत नाही.

* वंचित बहुजन आघाडीबरोबरची आघाडी तुटल्यानंतर ‘जय भीम- जय मीम’चा नारा एमआयएमला पुढे नेता येईल का?

– दलित मतदार कोणत्याही एका पक्षाचे नाहीत. निवडणूक निकालानंतर ‘जय भीम’चा नारा अधिक बुलंद झालेला तुम्हाला दिसेल. अलिकडच्या काळात अ‍ॅड्. ओवेसी यांची सर्वात मोठी सभा धारावीमध्ये झाली. मनोज संसारे या उमेदवारांसाठी जमलेली गर्दी हे सांगणारी होती. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात अरुण बोर्डे यांच्या प्रचारात अनेक भीमसैनिक एमआयएमबरोबर काम करीत आहेत. बाकी सर्व पक्षांना आघाडी करून निवडणुका लढवाव्या लागत आहेत. आमचा आत्मविश्वास एवढा आहे की आम्ही एकटे निवडणुकीला सामोरे जात आहोत.

* वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र असते तर चित्र बदलले असते का?

– हो, हे खरे आहे. एकत्र असतो तर चांगले घडले असते. आता वंचित बहुजन आघाडीबरोबर नसल्यामुळे काही जागांवर आम्हाला फटका बसू शकतो. पण आम्ही जेवढय़ा जागा लढतो आहोत त्याच्या विजयाची टक्केवारी अधिक असेल. पण आमच्या पक्षाचे नाव मजलीस-ए- इत्तेहादुल मुसलमीन असे अवघड नसते तर मुस्लीमव्यतिरिक्त समाजामध्ये आमची धोरणे अधिक लवकर पोहचली असती. पण आम्ही वंचित बहुजनला आघाडीचा प्रस्ताव देताना केवळ ७४ जागांची यादी पूर्वी दिली होती. त्यात बदल करून ३२ जागा मागितल्या होत्या. त्यांनी केवळ आठ जागा देऊ, असे सांगत आमची एका अर्थाने थट्टाच केली. त्यामुळे आम्ही वेगळे लढतो आहोत. त्याचे परिणाम नक्कीच होतील.

वंचित बहुजन आघाडीबरोबर नसल्यामुळे काही जागांवर आम्हाला फटका बसू शकतो. पण आम्ही जेवढय़ा जागा लढतो आहोत त्याच्या विजयाची टक्केवारी अधिक असेल.