सोमवारी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठिंबा पत्र मिळवण्यास अपयश आले. सोमवारी रात्री साडेसातपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी वेळ दिला होता. मात्र काल सकाळपासून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा मिळवण्यासाठी अनेकदा प्रयत्न करुनही त्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने राज्यपालांनी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. सोमावारी नक्की काय काय घडलं याबद्दलची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांना दिली आहे.

अजित पवार यांनी मंगळवारी सत्तास्थापनेसंदर्भात चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला जाण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांना सोमवारी काय घडले यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी कालच्या दिवसभरातील घडामोडींवर प्रकाश टाकला. “काल सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसातपर्यंत काँग्रेसचे पाठिंब्याचे पत्र मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केला. राष्ट्रवादीचे सर्वच नेते त्यामध्ये अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ असे आम्ही सर्वच एकत्रच होतो. काल सुरुवातील आम्हाला सांगण्यात आले सकाळी दहाला बैठक झाल्यानंतर पत्र मिळेल. नंतर सांगण्यात आले की चार वाजता बैठक आहे त्यानंतर पत्र मिळेल. नंतर संध्याकाळी साडेसातपर्यंत त्यांच्याकडून काही पत्र मिळू शकले नाही. आम्ही दोघे (राष्ट्रवादी आणि काँग्रेस) एकत्र निवडणुक लढल्याने जो काही निर्णय असेल तो एकत्र घेण्यात येईल असे धोरण असल्याने आम्ही पत्र देण्यासाठी दिल्लीवरुन पत्र येण्याची वाट पाहत होतो,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काल काँग्रेसचे आमदार जयपूरला असल्याने त्यांच्याबरोबर संवाद साधण्यात अडचणी निर्माण होत असल्याने पाठिंब्याचे पत्र देण्यास उशीर झाल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.