राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. शुक्रवार रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असं वाटत असतानाच अचानक शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीमुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या दोन्ही नेत्यांना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारस शपथ दिली. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर ‘अजित पवारांनी दिलेलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही,’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र या घडामोडींनंतर सोशल नेटवर्किंगवरुन पुन्हा एकदा दबक्या आवाजात आता तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवे अशी मागणी होऊ लगाली. यासंदर्भातील अनेक पोस्ट सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले. मात्र राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याची काही गरज नाही असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनीही सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त केलं आहे.

मराठी माणसांसाठी दोन भावांनी एकत्र यायला हवं असं म्हणणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना खोपकर यांनी सुनावले आहे.
“शिवसेनेला जरा कुठे राजकारणात त्रास झाला की आपले महाराष्ट्र सैनिक चालू होतात ‘आता मराठी माणसासाठी दोन्ही भावांना एकत्र यायला हवे…’ काही गरज नाही. त्यासाठी राजसाहेब एकटे समर्थ आहेत, राज ठाकरेंनाही आतापर्यंत कितीदा राजकारणात त्रास झाला. तेव्हा कुठे गेला होता हा भाऊ?,” असा सवाल खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मनसेचे सहा नगरसेवक चोरल्याचा आरोपही खोपकर यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे. ही चोरी करताना कुठं गेलं होतं बंधुत्व असंही खोपकर यांनी म्हटलं आहे. “मुंबई महानगरपालिकेत मनसेचे फक्त ७ नगरसेवक निवडूण आले होते. तेव्हा स्वत:च्या भावाचे ६ नगरसेवक चोरले. तेव्हा का विचार नाही केला की माझ्याकडे खूप काही आहे पण भावाकडे काहीच नाही. कसे घेऊ त्याचे नगरसेवक?, तेव्हा कुठे गेलं बंधुत्व?,” असा टोला खोपकर यांनी उद्धव यांचे नाव घेता लगावला आहे.

तसेच दोन भवांनी एकत्र यायचे की नाही हे त्यांना ठरवू द्या असंही खोपकर या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. “मला वाटते अश्या खूप गोष्टी आहेत सांगण्यासारखा पण त्या आता महत्त्वाच्या नाहीत. आपला पक्ष कसा वाढेल त्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. आणि राहिला दोन्ही भावांचा एकत्र येण्याचा प्रश्न ते दोन्ही भावांना ठरवु द्या. पण सध्या तरी असं काही होणार नाही आणि अपेक्षा पण करु नका,” असं त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वत: भावनिक होऊन इतकांना भावनिक करत बसू नये असा सल्लाही खोपकर यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. “बाकी महाराष्ट्र सैनिक हा खुप भावनिक आहे हे कळते. पण त्याने पक्ष वाढणार नाही हे देखील तितकेच सत्य आहे. सर्वच पक्ष नीच राजकारण करत आहेत आणि त्याचा फायदा मनसेला कसा होईल त्यावर लक्ष केंद्रित करायची जास्त गरज आहे. उगाच स्वत:ही भावनिक होऊन इतरांनाही भावनिक करत बसु नका,” असं खोपकर म्हणाले आहेत.

खोपकर यांच्याबरोबरच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील सत्तापेचावर सोशल नेटवर्किंगवरुन आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. “राज्यातल्या चारही प्रमुख पक्षांची नैतिक पातळी घसरली आहे, त्यामुळे एक राजकीय कार्यकर्ता आणि मतदार म्हणून पुन्हा एकदा जनादेश घ्यायला हवा,” अशी पोस्ट संदीप देशपांडे यांनी फेसबूकवर केली होती.