तीन आठवड्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्यानं अखेर मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाछी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. अशातच भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी ‘अब आयेगा मजा’ अशा आशयाचं ट्विट केलं आहे. त्यातच विशेष म्हणजे नितेश राणे यांनी या ट्विटसोबत नारायण राणे यांचा फोटोही ट्विट केला आहे.

यापूर्वी भाजपानं राज्यात सत्ता स्थापन करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले होते. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. परंतु नारायण राणे यांनी राज्यात भाजपाच सरकार स्थापन करणार असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. शिवसेना जे काही करत आहे ते नैतिकतेला धरून नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नीती अजूनही उद्धव ठाकरेंना कळली नाही का? हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला उल्लू बनवत आहेत, असंही ते म्हणाले होते.