महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेने आम्हाला पहिल्यांदाच पाठिंबा मिळण्यासंदर्भात अधिकृत संपर्क साधला. दोन्ही पक्ष यावर विचार करुन योग्य तो निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. तर भाजपा सरकार हे मनमानी करणारं सरकार आहे अशी टीका अहमद पटेल यांनी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. राज्यपालांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं मात्र काँग्रेसला दिलं नाही यावरही अहमद पटेल यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी काल पहिल्यांदाच सोनिया गांधी यांना फोन करुन सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मागितला. पाठिंब्यासंदर्भात आज आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. शरद पवार यांच्याशी आम्ही बोललो. आता याबाबत काय तो निर्णय घेऊ असं अहमद पटेल यांनी स्पष्ट केलं. काल पहिल्यांदाच उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले असं शरद पवार यांनी म्हटलं. काही मुद्दे आमच्यातच स्पष्ट व्हायचे आहेत ते झाले की आम्ही शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ असंही अहमद पटेल यांनी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.