वंचित बहुजन आघाडीमध्ये अखेर बिघाडी झाल्याचं समोर आलं आहे. कारण इम्तियाज जलील यांनी केलेलं वक्तव्य हे पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाली आहे हेच समोर आलं आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलतानाच एमआयएम ही विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमचा मान राखला नाही. लोकसभा निवडणुकीत एमआयएमसोबत हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मतं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे यावेळी म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्हाला किमान ७४ जागा द्या असंही म्हटलं होतं. मात्र जागावाटपावरच्या चर्चा निष्फळ ठरल्या.

दरम्यान इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता ओवेसी आमचे मित्र आहेत. त्यांच्याशी आम्ही चर्चा करु इतर काय म्हणतात ते महत्त्वाचे नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. आज अखेर इम्तियाज जलील यांनी मांडेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाली आहे हे निश्चित झालं आहे.

“आम्ही गणेश विसर्जनानंतर पहिली यादी जाहीर करु” असं कालच प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं. “काँग्रेससोबत कोणतीही चर्चा करणार नाही मात्र एमआयएमसोबत मात्र शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा करु ” असंही ते म्हटले होते. “विधानसभा निवडणुकीतील युतीबाबत काँग्रेस व वंचित आघाडी यांच्यात चर्चा झाली. परंतु काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही युतीबाबत गंभीर आहे, असे वाटत नाही. उलट वंचित आघाडीला वापरून घेण्याचा काँग्रेसचा मानस दिसतो,” अशी टीका आंबेडकर यांनी केली होती.  एमआयएमला सोबत घेऊन निवडणूक लढू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. मात्र “आज इम्तियाज जलील यांनी जे म्हटलं आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका आहे” असं ओवेसी यांनी म्हटल्याने एमआयएम आणि भारिपचा काडीमोड झाल्याचं स्पष्ट झालं आहे.