नांदगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पंकज भुजबळ यांचा शिवसेनेचे सुहास कांदे यांनी तब्बल १३ हजार ८८९ मतांनी पराभव केला आहे. सुहास कांदे यांना ८४ हजार ९४८ मते मिळाली आहेत. पंकज भुजबळ हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र असल्यामुळे त्यांच्या नावाभोवती विषेश वलय होते. परंतु हे वलय त्यांचा पराभव रोखू शकले नाही. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करुन जोरदार प्रचार केला होता. परंतु त्यांना केवळ ७० हजार ९७१ मतांपर्यंतच मजल मारता आली.

नांदगाव मतदारसंघात १ लाख ८९ हजार २५२ मतदारांनी मतदान केले होते. या ठिकाणी ५९.८९ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या तुलनेत यंदाच्या मतदानातील टक्केवारी घसरलेली आहे. पावसाळी वातावरण, रुसलेले मतदार या सर्वांचा परिणाम शहरातील टक्केवारी घसरली. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पंकज भुजबळ व सुहास कांदे यांच्यात अटीतटीची लढत होती. त्यामुळे विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत समर्थकांमध्ये गोंधळ होता. परंतु अखेर सुहास कांदे यांनी भुजबळांचा पराभव केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या वेळच्या निवडणुकीत आघाडी व महायुती झाल्याने मतविभाजन टाळले गेले.