ज्यांनी पक्ष बदलले त्यांच्या विरोधात यावेळी जनता आहे. पक्ष बदलणारे स्वत:च्या स्वार्थासाठी दुसरीकडे गेले असून त्यांना जनता नक्की धडा शिकवणार आहे. शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस अघाडीचे उमेदवार सुरेश थोरात मोठय़ा मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

शिर्डी विश्रामगृहावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी पवार यांची भेट घेतली. यावेळी समवेत आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्यासह राजेंद्र फाळके, डॉ.एकनाथ गोंदकर, तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, रावसाहेब म्हस्के, भागवत ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की राज्यामध्ये भाजपने भूलथापांनी जनतेला फसवले आहे. आता मात्र जनतेला सत्य समजले आहे. राज्यात परिवर्तनाची लाट असून अहमदनगर जिल्ह्यतील काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोठय़ा संख्येने उभे होणार आहे शिर्डी मतदारसंघ हा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासून प्रकाशझोतात आला आहे. शिर्डी मतदारसंघ येथेही परिवर्तन अटळ आहे. सुरेश थोरात हा नव्या दमाचा उमेदवार आहे. ते नक्कीच नव्या आव्हानांना सामोरे जाणार असून त्यांचा विजय निश्चित होईल. सर्वानी एकजुटीने त्याच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन शरद पवार यांनी केले.