विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या बंडोबांची मनधरणी करण्यासाठी सर्वच पक्षीय नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, यामध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना यश आलं असून पालघरमधून आठवडाभरापूर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकणाऱ्या अमित घोडा यांचा दोन दिवसांमध्ये पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अमित घोडा आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दाट शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेने संधी नाकारल्यामुळे घोडा यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बंडखोरी करत त्यांनी महाआघाडीकडून उमेदवारी अर्जही भरला होता. अमित घोडा यांची काल दुपारी ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांशी आणि नंतर मुंबईतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली. त्यानंतर, घोडा हे आज माघार घेण्याबाबतचा निर्णय जाहीर करतील असे शिवसेनेचे स्थानिक नेते खासगीत सांगत आहेत.

उमेदवारी अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे, अमित घोडा आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील. परिणामी, जागांच्या वाटाघाटीत काँग्रेसकडून हा मतदारसंघ पदरात पाडून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची पंचाईत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामुळे श्रीनिवास वनगा यांचा मार्ग सोपा होणार आहे.