कर्जत: नगरपंचायतमधील सत्तांतरास कारण ठरलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील ११ बंडखोर नगरसेवकांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण घुले यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगराध्यक्ष रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे,उपघटनेते सतीश पाटील, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, छाया शेलार यांचे पती सुनील शेलार, सुवर्णा सुपेकर यांचे पती रवींद्र सुपेकर, ज्योती शेळके यांचे पती लालासाहेब शेळके, भूषण खरात उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीच्या ८ तर काँग्रेसच्या ३ नगरसेवकांचा समावेश आहे.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा झटका बसणार आहे. भाजप प्रवेशाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु नगरपंचायतची सत्ता ताब्यात आल्याने भाजपची ताकद वाढली आहे. यापूर्वी नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता होती. राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पद होते.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष मेहेत्रे यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून कर्जत शहरात कोणतीही विकासकामे झाली नाहीत. निधी मिळाला नाही. त्यामुळे आम्हा ११ जणांना वेगळा निर्णय घ्यावा लागला. सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीमध्ये सत्तांतर केले. शहर विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याची गरज आहे हे आमच्या लक्षात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
गेल्या निवडणुकीवेळी कर्जतमध्ये भाजपाला उमेदवार मिळू शकले नव्हते, मात्र आता भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच निर्माण होणार आहे.