Shivaji Maharaj Forts In UNESCO World Heritage: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून दिली. या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या निकषांवर या १२ किल्ल्यांची निवड झाली. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत.”

युनेस्कोच्या या निर्णयानंतर पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना ते म्हणाले की, “हा ऐतिहासिक निर्णय असून, यामुळे छत्रपती शिवरायांचे कार्य आता जगभरात पोहोचेल.”

या ऐतिहासिक घडामोडीसाठी अनेक शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे काम केले. केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने २०२४-२५ या वर्षाकरिता निवडलेल्या ५ प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा मराठा लष्करी स्थापत्य हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने युनेस्कोकडे पाठविण्यासाठी निवडला होता.

या यशस्वी प्रवासात वास्तुविशारद डॉ. शिखा जैन आणि पुरातत्त्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांचे योगदान मोलाचे ठरले. युनेस्कोच्या ४६व्या अधिवेशनात राज्यातील अधिकारी, गड संवर्धन समिती सदस्य व तज्ज्ञांचा सहभाग होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये ICOMOS तज्ज्ञ ह्वाजोंग ली यांनी या १२ किल्ल्यांना भेट दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हटले आहे की, “सर्वप्रथम मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वतः विविध राजदूतांशी संपर्क केला. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. यामध्ये अनेकांचा हातभार असून, देशभरातील शिवभक्तांसाठी आज आनंदाचा क्षण आहे. मी पुनःश्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.”