सांगली : सावंतपूर (ता. पलूस) येथील नळवाडी भागात तरससदृश प्राण्याच्या हल्ल्यात शेडमधील १२ शेळ्या ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. तरसानेच हा हल्ला केल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.
सावंतपूर येथील शेतकरी सयाजी शिवाजी जाधव यांच्या शेतात शेळ्यांचे शेड आहे. अनेक वर्षांपासून शेतीपूरक म्हणून शेळ्यांचे पालन करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी (दि. १०) नेहमीप्रमाणे ते शेतातून घरी गेले. आज, शुक्रवारी सकाळी शेतात गेल्यावर, त्यांना सर्व शेळ्या मृतावस्थेत दिसल्या. यामध्ये शेळ्या ४, बोकड ३, पाट ५ अशी एकूण १२ जनावरे ठार झाल्याचे आढळले, तर एक पाट गायब आहे.
या घटनेची माहिती समजताच सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, उप वनसंरक्षक सागर गौते, वनक्षेत्रपाल संतोष शिरसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या वतीने वनपाल अशोक जाधव, वनरक्षक सुरेखा लोहार, पहारेकरी गणेश कांबळे, प्राणिमित्र तन्मय कांबळे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. त्यांना आसपास तरस या प्राण्याच्या पायांचे ठसे व केस आढळले. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी केली आहे.
संतोष शिरसटवार यांनी सदर परिवारास वन विभागामार्फत शासकीय नियमानुसार मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच वन्यजीवांपासून पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी शेतात, तसेच निर्जन ठिकाणी गोठा असेल तर जाळी मारून बंदिस्त करणे, संध्याकाळच्या वेळी मिरचीची धुरी करणे, प्राणी दिसत असेल तर पाठलाग न करता आवाज करणे, तसेच याबाबत तत्काळ वन विभागास कल्पना देण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्याच्या घटनेची दखल घेऊन शासनाकडून या शेतकऱ्याच्या कुटुंबास भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली आहे.