पुण्याच्या कॅम्प भागातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या १३ विद्यार्थ्यांचा सोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये १० मुली आणि ३ मुलांचा समावेश आहे. बुडालेल्या विद्यार्थ्यांपैकी सात जणांना वाचविण्यात यश आले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमय्या अन्सारी, सफिया काझी, युसुफ अन्सारी, फरीन सय्यद, इफ्तेकार शेख, साजिद चौधरी, समरीन शेख, शफी अन्सारी, राज तंजनी, रफिया अन्सारी, सुप्रिया पाल, शिफा काझी, स्वप्नाली संगत अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबेदा इनामदार महाविद्यालयाची १३० विद्यार्थ्यांची सहल सोमवारी मुरुडला गेली होती. तीन लक्झरी बसमधून सर्वजण मुरुडला पोहोचले. दुपारी जेवण केल्यानंतर काही विद्यार्थी मुरुडच्या समुद्रात उतरले. समुद्रात आतमध्ये गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी २० जण बुडाले. ही घटना कळताच मच्छिमारांनी लगेचच समुद्रात उतरून बुडणाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पाण्यात बुडून १३ जणांचा मृत्यू झाला असून, या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सात जणांना वाचविण्यात यश आले असून त्यांना मुरुड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत पावलेले सर्वजण १८ ते २२ वयोगटातील आहेत.
संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून, पुण्यातून दहा रुग्णवाहिकाही पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी दिली. समुद्र किनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील अलिबाग मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी लाखो पर्यटक सहलीसाठी येत असतात. मात्र, पाण्याच्या अंतर्गत प्रवाहाचा तसेच भरती आणि ओहोटीचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले जातात. अलिबाग नगरपालिकेनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीव रक्षकांची नेमणूक केली असली तरी नागाव, काशिद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, किहीम या ठिकाणी जीव रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2016 रोजी प्रकाशित
मुरुडमधील समुद्रात बुडून पुण्यातील १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू
आबेदा इनामदार महाविद्यालयाची १३० विद्यार्थ्यांची सहल सोमवारी मुरुडला गेली होती.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 01-02-2016 at 17:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 student in pune drowned at murud beach