धवल कुलकर्णी 

जंगलात वन्य प्राण्यांची बेकायदा शिकार करणाऱ्या आणि वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांवरती वन विभागाने कारवाई सुरु केली आहे. संक्रांतीचे निमित्त साधून शिकारी कुत्र्यांसह शिकार करणाऱ्या टोळीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केलं आहे. संक्रांतीनिमित्त खवल्या मांजरांची शिकार ही टोळी करत होती. या खवल्या मांजरासह वन विभागाने या टोळीला जेरबंद केलं.

मंगळवारी रात्री सावंतवाडी बेळगाव मार्गावर माडखोल येथे खवल्या मांजर यांसह सात जणांना ताब्यात घेण्यात आलं. हे सात आरोपी बांदा, कणकवली, लांजा आणि शाहूवाडी भागातले आहेत. या रॅकेटचे लागेबांधे कोल्हापूर आणि रत्नागिरी सारख्या जिल्ह्यांमध्ये असू शकतात असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती कोल्हापूर वनवृत्तचे मुख्य वन्यजीव संरक्षक व्ही क्लेमेंट बेन यांनी दिली.

खवले मांजर या प्राण्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात शिकार आणि तस्करी होते. खवल्या मांजर हा कीटक खाणारा प्राणी असल्यामुळे तो खऱ्या अर्थाने शेतकर्‍यांचा मित्र आहे. मात्र असा गैरसमज आहे की खवले मांजर ज्याला इंग्रजीमध्ये पेंगोलिन असे म्हणतात, त्याचे रक्त, मांस आणि खवले हे औषधी स्वरूपाचे आहेत. त्यामुळे खवले मांजराच्या या अवयवांना चीन आणि व्हिएतनाम यासारख्या देशांमध्ये प्रचंड मागणी आहे. पण अर्थात या समजांना कुठलाही शास्त्रीय आधार नसून ती अंधश्रद्धा आहे.

त्याचबरोबर चंदगड तालुक्यात संक्रांतीनिमित्त काही गावांमध्ये शिकार होत असल्याची बातमी वनविभागाला प्राप्त झाली होती.  त्यानुसार मंगळवारी रात्री वनक्षेत्रपाल चंदगड आणि वनकर्मचारी यांनी फिरत्या पथकासह जांबरे रस्त्यावर संयुक्त गस्त करीत असताना मौजे देसाईवाडी तालुका चंदगड येथे संशयित वाहन थांबवून त्याची चौकशी केली. या वाहनांमध्ये 14 संशयित इसम आढळून आले. या टोळीसोबत 14 शिकारी कुत्रे ,एक शिकारीचा भाला आणि 6 बॅटरी हे साहित्य आढळून आले. हे सर्व चंदगड तालुक्यात राहणारे आहेत.

यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आणि या कारवाईमध्ये वनक्षेत्रपाल, चंदगड डी जी राक्षे, वनक्षेत्रपाल, फिरते पथक, युवराज पाटील आणि वन कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. कोल्हापूर वनवृत्तामध्ये आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास होणाऱ्या बेकायदेशीर शिकारीवर अशीच कारवाई होत राहील असे क्लेमेंट बेन यांनी सांगितले.