दोन बंदुकधारी व्यक्तींनी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डी पी सावंत यांच्या घरात घुसून खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी सावंत आपल्या घरात विश्रांती घेत असताना दोन बंदुकधारी व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. आरोपींनी सावंत यांच्या घरात घुसून ५० हजारांची मागणी केली. तसेच त्यांनी घरातील नोकराला मारहाण केली आहे. हा प्रकारानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने सूत्रं हलवत एका आरोपीला अटक केली आहे. अन्य एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे. काँग्रेस नेते डीपी सावंत हे नांदेड शहरातील शिवाजी नगर परिसरात राहतात. ते काँग्रेसचे नेते आणि सार्वजानिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात.
आज दुपारी दोन बंदुकधारी व्यक्तींनी डी पी सावंत यांच्या घरात घुसखोरी केली होती. यावेळी आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच आरोपींनी घरातील नोकराला मारहाणी केली. नोकराच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घरातील गोंधळ ऐकून डी पी सावंत आपल्या खोलीतून बाहेर आले. यावेळी आरोपींनी त्यांच्या डोक्याला बंदूक लावून ५० हजार रुपयांची मागणी केली.
आरोपी बंदुकधारी नेमके कोण होते? कोणत्या उद्देशानं त्यांनी घरात घुसखोरी केली होती. याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेची दखल शिवाजीनगर पोलिसांनी घेतली असून घटनेचा तपास केला जात आहे. दिवसाढवळ्या एका माजी मंत्र्याच्या घरात असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.