सातारा – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना रविवारी ( दि. २९) रात्री बरड (ता. फलटण) हद्दीत घडली. तुषार रामेश्वर बावनकुळे (वय २२, रा. खलासना, नागपूर) व मधुकरराव तुकाराम शेंडे (५५, रा. मेडिकल चौक, नागपूर) अशी त्या मृत वारकऱ्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती फलटणचे पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम साताऱ्यातील बरड (ता. फलटण) येथे होता. बरड येथील मुक्कामवेळी मृत वारकरी कपडे वाळत टाकण्यासाठी एका विजेच्या खांबाला दोरी बांधत असताना त्यांना हा विजेचा धक्का बसला. यामध्ये सुरुवातीला तुषार यांना हा धक्का बसला. त्यांना बाजूला करण्यासाठी पुढे आलेले मधुकरराव यांनाही विजेचा धक्का बसला. दोघेही बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ  उपचारासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा यांनी दोघेही उपचारापूर्वी मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या सहकारी वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रात्री बरड येथे मुक्कामी असताना ही  घटना घडली. वासुदेव महाराज टापरे (रा.काटोल) यांच्या दिंडी मधील हे दोन्हीही वारकरी नागपूर जिल्ह्यातील विहार तालुक्यातील आहेत. शेंडे हे अविवाहित होते व त्यांनी संपूर्ण जीवन वारकरी सेवा व समाजसेवेला अर्पण केले होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सक्रिय सदस्य होते. विविध सामाजिक संघटनांशी त्यांचे संबंध होते. वारी शेवटच्या टप्प्यात पंढरपूर नजीक असताना ही दुर्घटना घडल्याने वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.