जिल्ह्यात हत्तीरोग्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भात सर्वाधिक म्हणजे २० हजार १३० हत्तीरुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात असून यात जिल्हाचा प्रथम क्रमांक आहे. 

‘टय़ुलेक्स’ नावाच्या डासामुळे होणारा हत्तीरोग जिल्ह्यात वेगाने पसरत आहे. हत्तीरोग निर्मूलनासाठी शासनाने दिलेले उद्दिष्टपूर्तीचे वर्षे २०१५ मध्ये संपणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या औषधोपचार मोहिमेनंतर रुग्णांच्या संख्येत केवळ अडीच पटीने घट झाली आहे. असे असतानाही आता डासांचा नायनाट करून हत्तीरोग निर्मूलन करू, असा कांगावा आरोग्य विभाग करू लागला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात सर्वाधिक रुग्ण या जिल्ह्यात असल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. शासन स्तरावरून २००३ सालापर्यंत या रोगावर प्रतिबंधासाठी फारशी उपाययोजना करण्यात आली नाही. मात्र, वाढत्या आकडेवारीने २००४ पासून हत्तीरोग निर्मूलन योजना प्रशासनाला राबवणे भाग पडले आहे. त्यानंतरही रुग्णांच्या संख्येत घट होण्याऐवजी भरच पडताना दिसून येत आहे.
हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी मोहीम सुरू केल्यानंतर तोकडय़ा आरोग्य यंत्रणेमुळे या रोगाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. प्राप्त माहितीनुसार २००४ मध्ये ११ हजार ८३५ रुग्ण, २००५ मध्ये २१ हजार ७८८, २००६ मध्ये २० हजार ३०३, २००७ मध्ये २५ हजार ८५८, २००८ मध्ये २६ हजार २४०, २००९ मध्ये १७ हजार २३२, २०१० मध्ये १७ हजार, २०११ मध्ये २४ हजार, तर २०१४ मध्ये डिसेंबपर्यंत २० हजार १३० रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, मूल, सावली, सिंदेवाही, चिमूर आदी पाच तालुक्यांमध्ये प्रशासनाच्या आकडेवारीवरून सर्वाधिक रुग्ण असल्याचे स्पष्ट होते. सावली व ब्रह्मपुरी तालुक्यात काही गावात तर एका घरी तीन-तीन रुग्ण असल्याचेही निदर्शनास आले आहे. यावरून हा रोग ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात फोफावत आहे. या रोगाच्या जंतूंनी माणसाच्या शरीरात प्रवेश केला तर चार-पाच वर्षे ठाण मांडून बसतात. तीस वर्षे वयोगटानंतर या रोगाची लागण होण्याचे प्रमाण सर्वात जास्त दिसून येत आहे. एकदा डास चावला तर त्याचा परिणाम दीड वर्षांनी दिसायला लागतो. ज्या परिसरात घाण व गढूळ पाणी साचून असते. तेथे या रोगाच्या डासाला पोषक वातावरण असते व तेथून हत्तीरोगाचे मूळ दिसून येत आहे.
हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी शासनाने २००४ मध्ये हत्तीरोग निर्मूलन योजनेचा शुभारंभ राज्यभरात केला होता. ही योजना २०१५ पर्यंत राबवण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या दहा वर्षांपासून रुग्णांना औषधोपचार सुरू आहे. याच कार्यकाळातील पाच वर्षांचा विचार केला तर सातत्याने अडीच पटीने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतरच्या दोन वर्षांतील आकडेवारी बघितली तर रुग्णांच्या संख्येत अडीच पटीने घट झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे, पण प्रत्यक्ष आकडेवारीवर नजर टाकल्यास रुग्णांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. ‘टय़ुलेक्स’ डास जिवंत राहण्यासाठी ३७ अं.से. पेक्षा जास्त तापमानाची गरज आहे. यापेक्षा जास्त तापमान चंद्रपूर जिल्ह्यात नेहमीच राहत असल्याने डासाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
24