सांगली : इस्लामपूरच्या राजारामबापू दूध संघाने दूध उत्पादक, दूध पुरवठा केंद्रासाठी दूध दरातील फरकापोटी सुमारे २१ कोटी रुपये वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे व उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी अध्यक्ष जगताप यांनी सांगितले, प्राथमिक दूध संस्थांच्या दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी २.४५ रुपये तर गाय दुधासाठी १.४५ रुपये तर दूध पुरवठा केंद्रासाठी म्हैस दुधासाठी २.३५ रुपये आणि गाय दुधासाठी १.३५ रुपये प्रतिलिटर देण्यात येणार आहेत. ही फरक देयके विना कपात दिवाळीपूर्वी संबंधित बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असून यासाठी २१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच संघाच्या कर्मचाऱ्यांना २०.८३ टक्के बोनसही त्यांनी जाहीर केला. दूध संघाचे सध्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू असून मार्गदर्शक माजी मंत्री आमदार जयंत पाटील व कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने नेत्रदीपक प्रगती केली आहे.
दूध संघाने दसऱ्यानिमित्त सभासदांना साडेसहा टन आम्रखंडाचे वाटप केले असून दिवाळीनिमित्त सभासदांना साडेसहा टन तूप वाटप करण्यात येत आहे. यासाठी संघाने ६१ लाख १० हजार रुपयांची तरतूद केली आहे.
तसेच संघाने कृष्णा पशुखाद्याची दीपावली धमाका ऑफर सुरू केलेली असून कृष्णा पशुखाद्याच्या प्रत्येक पोत्यामध्ये दीपावलीनिमित्त मोती साबन भेट स्कीम सुरू केलेली आहे. दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून संघ दूध उत्पादकाच्या सर्वांगीण विकासासाठी संघामार्फत विविध प्रकारच्या सेवासुविधा देण्यात येतात. संघ कार्यस्थळावर दूध भुकटी प्रकल्प यशस्वीपणे सुरू असून निर्यातक्षम दूध भुकटीचे उत्पादन सुरू आहे. संघाची सध्याची वार्षिक उलाढाल ३५० कोटी इतकी आहे. या वेळी संघाचे संचालक प्रशांत थोरात, पोपटराव जगताप, जगन्नाथ पाटील व कार्यकारी संचालक डॉ. एस. डी. ढोप उपस्थित होते.