अहिल्यानगर : मोहरम विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ४३९ समाजकंटकांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०३, तोफखाना हद्दीतील १६२, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७४ जणांचा समावेश असल्याची माहिती शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.

शहरात मोहरमनिमित्त सवारीची स्थापना होते, या विसर्जनास ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. विसर्जन मिरवणूक रविवारी (दि. ६) दुपारी कोठला भागातून निघेल. तत्पूर्वी उद्या, शनिवारी ‘कत्तल की रात’ची मिरवणूक निघणार आहे. या दोन्ही मिरवणुकांसाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे तसेच बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. कोठला भागातून निघणारी विसर्जन मिरवणूक शहरातील विविध मार्गाने दिल्ली गेटला बाहेर पडते व पुढे सावेडी गावठाण हद्दीत तिचे विसर्जन केले जाते.