शहराच्या पूर्व भागातील वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर ठरलेल्या मरकडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात झालेल्या चोरीचा छडा लावण्यास शहर गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले असून या गुन्ह्य़ात याच रुग्णालयातील एका चतुर्थ श्रेणी सेवकासह चौघा जणांचा सहभाग आढळून आला आहे.
राहुल दत्तात्रेय गुटूनोळ्ळू या चतुर्थश्रेणी सेवकासह मारूती नरसिंग बावडेकर (२६), रतिकांत नंदकुमार कमलापुरे (२०) व कैफन  रवी कुनसेकर (१८, सर्व रा. न्यू बाबू जगजीवनराम झोपडपट्टी, सोलापूर) अशी या गुन्ह्य़ात अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्य़ात वापरलेल्या मोटारसायकलसह दोन लाख ९५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. गेल्या १५ फेब्रुवारी मरकडेय सोलापूर सहकारी  रुग्णालयातील सहाव्या मजल्यावर रोखपालाचा कक्ष फोडून चार लाख १८ हजार १६६ रुपयांची रोकड अज्ञात चोरटय़ांनी लंपास केली होती. रोखपाल राजीव नागेश येदूर यांनी याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी शहर गुन्हे शाखेचे पथक गठीत करण्यात आले असता मिळालेल्या माहितीनुसार याच रुग्णालयातील चतुर्थश्रणी कर्मचारी राहुल गुटूनोळ्ळू याच्यावर संशय बळावला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. त्याच्या इतर तिघा साथीदारांनाही पकडण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्ह्य़ात वापरलेली मोटारसायकल व दोन लाख ५५ हजारांची रोकड असा ऐवज हस्तगत करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती व पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, हवालदार अंबादास राठोड, कमलाकांत माने, पोलीस नाईक अनिल जाधव, अल्ताफ शेख, झेड. एम.शेख, मोहन गवळी, शिवानंद भीमदे, लक्ष्मीकांत फुटाणे, गणेश शिर्के, फिरोज जमादार,नागेश कामुर्ती यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.