डेंग्यूसदृश्य तापाने जिल्हा फणफणला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात पाच जणांचा जीव डेंग्यूने घेतला असून अनेकांना लागण झाली आहे. या रोगाची तीव्रता शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यात ३०८ रुग्णांच्या रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले असून यात जिल्ह्यातील ६० रुग्णांचा समावेश आहे. लगतच्या अकोला जिल्ह्यात डेंग्यूने थ्ैामान घातले आहे. या पाश्र्वभूमीवर शहरात धुरफवारणी करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
राज्यात अनेक मोठय़ा शहरांमध्ये डेंग्यूच्या तापाने थमान घातले आहे. त्यात जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातही गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूसदृश्य तापाचे थमान सुरू आहे. यात ७ ऑक्टोबरला हिवरा आश्रम येथील आशिष गौतम जाधव (२२), ९ ऑक्टोबरला आदिनाथ रामेश्वर पायघन (११,रा. अंजनी बु. ता. मेहकर), १८ ऑक्टोबरला गौरवी जयहरी सवडतकर (२, रा. मोहखेड ता.सिंदखेडराजा), २८ ऑक्टोबरला श्रद्धा रामकिसन ठाकरे (५, रा. शहापूर ता. मेहकर), ४ नोव्हेंबरला जितेश राम जाधव (१०, रा. जामखेड ता. मेहकर) आदींचा मृत्यू झाला, तर शेकडो जण या तापाने फणफणले आहेत. डेंग्यूसारख्या गंभीर आजाराकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, असे उच्च न्यायालयाने बजावल्यावरही आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच रुग्ण दगावत आहेत. डेंग्यूच्या रुग्णाच्या शरीरातील पेशी कमी होतात. त्यामुळे रुणाला प्लेटलेट्सची आवश्यकता मोठय़ा प्रमाणात भासते. त्यामुळे या आजारावर उपचार करून घेतांना रुग्णाला आर्थिक झळ बसते. आतापर्यंत जिल्ह्यातील ६० रुग्णांच्या रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे अकोला २०६, वाशिम ६१, अमरावती ४५३, यवतमाळ १३३८, असे एकूण २१३७ रुग्णांच्या रक्त नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
याबाबत काही डॉक्टरांशी चर्चा करतांना त्यांनी प्लेटलेट्स कमी झाल्यास काळे खजूर, एखादे फळ, दोन चमचे पपईच्या पानाचा रस रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्यास शरीरातील प्लेट्सलेट्सचे प्रमाण वाढू शकते, असे सांगितले. डेंग्यूसदृश्य रोग नियंत्रणात येत नसल्याने शहरवासीयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. देऊळगावराजात सुमारे १० रुग्णांवर डॉ. शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये डेंग्यूसदृश्य तापाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या तापावर नियंत्रण करण्यास आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. शहरातील अनेक लॅबमध्ये डेंग्यू तपासणी किट उपलब्ध असल्याने या रुग्णांचे निदान करून उपचार केले जात आहे. बुलढाण्यात डासांमुळे नागरिक त्रस्त असून विशेषत: सायंकाळी ५ ते रात्रीच्या वेळी हा त्रास बऱ्याच प्रमाणात जाणवतो.