धवल कुलकर्णी

मागच्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात वाघाच्या शिकारीनंतर वनखात्याने काही आरोपींना अटक केली. १२ जानेवारीला ब्रह्मपुरी विभागात एका वाघाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. नव्या वर्षात महाराष्ट्रात झालेला हा पहिला व्याघ्र मृत्यू होता.

धक्कादायक बाब अशी या वाघाची शिकार करून त्याचं डोकं आणि पंजे कापण्यात आले होते. तपासाअंती वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी गाय मालक बाजीराव मसाखेत्री आणि गुराखी राकेश झाडे यांना अटक करून वृत्त वाघाचे डोके आणि जाळलेले पाय शोधून काढले. मृत  वाघ हा T-42 वाघाच्या मादीचा बछडा होता.

या प्रकरणी कसून चौकशी आणि विचारपूस केली असता आरोपी गुराख्यांकडून त्यांचा साथीदार यशवंत बोबाटे याचे नाव समोर आले. बोबाटेला अटक केल्यानंतर प्रकरणात आणखी पाच आरोपींची नावं समजली. ज्यानंतर पोलिसांनी नारायण नागपुरे, बंडू पाल, दादाजी नवघडे, चक्रधर हुलके आणि यशवंत चिमुरकर यांनाही अटक करण्यात आली.

या आरोपींकडून पोलिसांनी मृत वाघाची १८ पैकी १३ नखं आणि चारपैकी तीन सुळे जप्त करण्यात आले. पाच नखं आणि एक दात आरोपींनी जाळून टाकला असं चौकशीत समोर आलं आहे.