अंतिम टप्प्यात तीव्र चुरस निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदार संघात आज किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत पण उत्साहात पार पडले. कूपवाड येथील मतदान केंद्रावर मतदनासाठी रांगेत उभारलेल्या महिला मतदाराचा हृदयविकाराने झालेला मृत्यू चटका लावणारा ठरला तर आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिनिधींमध्ये झालेली मारामारी वगळता अन्यत्र कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
सांगली लोकसभा मतदार संघातील मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठेमहांकाळ आणि जत या विधानसभा मतदार संघातील १७२५ मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. प्रारंभीच्या दोन तासांत मतदानासाठी येणा-या मतदारांची संख्या अल्पप्रमाणात होती. सकाळी ९ वाजेपर्यंत अवघे ९ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर मतदानास वेग आला. ११ वाजेपर्यंत २५ टक्के तर १ वाजेपर्यंत ३७.४८ टक्के मतदानाची नोंद झाली. तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४६.९२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
कूपवाड येथील मतदान केंद्र क्र. २१० या ठिकाणी मतदानासाठी आलेली महिला छाया शेलार सरोदे (४२, रा. सिद्धार्थनगर) रांगेत उभी असताना चक्कर येऊन पडली. जिल्हा परिषदेच्या शाळेत असणा-या मतदान केंद्रात ही घटना घडली. या महिलेला तत्काळ त्यांच्या शेजारी राहणारा संतोष सरोदे याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचे निधन झाले. तिचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या संदर्भात कूपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आटपाडी तालुक्यात शेटफळे येथे एका वृद्ध मतदाराचे मतदान करण्यावरून दोन कार्यकर्त्यांत मारामारी झाली. दोघेही उमेदवारांची प्रतिनिधी म्हणून मतदान बूथ क्र. ५ वर कार्यरत होते. भारतीय जनता पक्षाचे संतोष गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोमनाथ गायकवाड यांच्यात वादावादी प्रारंभी झाली. त्यातून दोघानींही एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या संदर्भात आटपाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून बघून घेण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
विटा परिसरात शांततेने व चुरशीने मतदान झाले असले, तरी दुपारी २ वाजल्यापासून सुमारे १ तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. विटा, आळसंद, भाळवणी, तादंळगाव आदी परिसरात जोरदार वादळ वा-यासह पावसाने हजेरी लावली. या ठिकाणी मतदारांच्या दुपारपासून मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
जत विधानसभा मतदार संघात सर्वाधिक चुरशीने मतदान पार पडले. कवठेमहांकाळ, आटपाडी या ठिकाणीही किरकोळ वादावादी वगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. तासगाव तालुक्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. तासगाव शहरात मात्र मतदानासाठी मतदार मोठय़ा संख्येने दिसत होते. तथापि शहरात कार्यकर्त्यांची संख्या त्या मानाने कमी आढळून आली.
सांगली, मिरज शहरात सकाळ पासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. अनेक मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. महिलांचीही मतदानासाठी ठिकठिकाणी रांग लागली होती. सांगलीतील गाव भागात अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली असल्याचे तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या.
मतदारांची ने-आण करण्यासाठी काँग्रेस व भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मोठय़ा प्रमाणावर खाजगी वाहनांची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यात आली होती. शहरात मात्र असे प्रकार अभावानाचे आढळले. बूथनजीक उभ्या असणा-या वाहनांची व्हिडीओ चित्रीकरण पोलिसांच्या पथकाने केले असून या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मतदान अधिका-यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2014 रोजी प्रकाशित
सांगलीत उत्साहात ६५ टक्के मतदान
अंतिम टप्प्यात तीव्र चुरस निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदार संघात आज किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत पण उत्साहात पार पडले. कूपवाड येथील मतदान केंद्रावर मतदनासाठी रांगेत उभारलेल्या महिला मतदाराचा हृदयविकाराने झालेला मृत्यू चटका लावणारा ठरला.
First published on: 18-04-2014 at 03:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 65 percent voting in spirit in sangli