सोलापूर शहर व जिल्ह्य़ात उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे सरकला असताना आजारी रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. उष्मा वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडाभर जिल्ह्य़ात चक्कर येऊन तब्बल आठजण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. यात चार महिलांचा तर दोघा तरुणांचा समावेश आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांकडे या घटनांची नोंद झाली असताना वाढत्या उष्म्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी व आजारी रुग्णांवर वेळीच उपचारासाठी छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्याचा अद्याप पत्ता नसल्याचे दिसून येते.
शहर व जिल्ह्य़ात सर्वत्र तापमानाचा पारा वाढत चालला असताना वाढत्या उष्म्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. यात आजारी रुग्णांची संख्याही वाढत आहे. चक्कर येणे, डोकेदुखी, पोटदुखी तसेच ताप, उलटी-जुलाब यासारखे आजार वाढले आहेत.  वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात उष्माघात कक्ष उभारणे अपेक्षित आहे. वाढत्या उन्हाची तमा न बाळगता स्वत:च्या पोटपाण्यासाठी श्रम करणाऱ्या सामान्य गोरगरिबांना उष्म्याचा जास्त धोका असतो. त्यांना खासगी महागडे औषधोपचार परवडत नाहीत. त्यामुळे शासकीय रुग्णालयच आधार असतो.  परंतु त्याकडे रुग्णालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी दुर्लक्ष केले आहे. नजीकच्या काळात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत असताना यात शासकीय रुग्णालय यंत्रणा बेफिकीर असल्यामुळे आता जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
गेल्या आठवडाभरात जिल्ह्य़ात वाढत्या उष्म्याच्या पाश्र्वभूमीवर चक्कर येऊन आठजण मरण पावले आहेत. सांगोल्यात बसवेश्वर बाळू जाधव (२१, रा. पिलीव, ता. माळशिरस) या तरुणाला चक्कर आल्याने उपचारासाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. तर बार्शी तालुक्यातील यावली येथे राहणारा संदेश गोरख पासले (१८) हा तरुण बांधकामाच्या ठिकाणी भिंतीवर पाणी मारत असताना अचानक चक्कर आल्याने खाली कोसळला. त्याला बार्शीच्या जगदाळे मामा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. मोहोळ येथे कोंडिबा सखाराम क्षीरसागर (७०) या वृद्धाचाही अचानक चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे. तर पंढरपुरात सावरकर नगरात राहणाऱ्या अरुण व्यंकटेश कुलकर्णी (६८) यांचाही अचानकपणे चक्कर आल्याने मृत्यू झाला.
याशिवाय चार महिला चक्कर आल्यामुळे मरण पावल्या असून यात सुजाता मनोज नरसाळे (२३) ही तरुणी घराजवळ जनावरांना चारा घालत असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात दाखल केले असताना उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. करमाळ्यात आपल्या नातलगांकडे आलेल्या सुलोचना दगडू लोंढे (५५, रा. पर्वती पायथा, अंबेवाडा, पुणे) या रस्त्यावरून पायी चालत जात असताना अचानकपणे चक्कर आल्यामुळे खाली कोसळल्या. परंतु उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले. तर शोभा सिद्राम घंटे (२८, रा. कोन्हाळी, ता.अक्कलकोट) व लक्ष्मी दत्ता मोरे (३१, रा. नागनाथ गल्ली, मोहोळ) या दोघींचाही चक्कर आल्याने काही क्षणातच मृत्यू झाला. या सर्व घटनांची स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.