कराड : यात्रेवेळी फलक व आवाजाच्या भिंती (डीजे) लावण्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार धुमश्चक्री उडाल्याची घटना कोरेगाव (ता. कराड) येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार अक्षय अरुण सावंत याने दिलेल्या फिर्यादीवरून, सूरज दळवी, ओंकार सावंत, सिद्धार्थ पाटील, ओमसाई सावंत, शंभू सावंत, ऋषिकेश सावंत (सर्व रा. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. यात्रेवेळी शाळेजवळ फलक (बॅनर) लावण्याच्या कारणावरून संशयितांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे अक्षय सावंतने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे अक्षय सावंत हे जखमी झाले आहेत.
सूरज विलास दळवी याने ऋषिकेश ऊर्फ अक्षय अरुण सावंत, पंकज सावंत, उदय सावंत, अरुण सावंत, अविनाश सावंत, भानुदास सावंत, जालिंदर सावंत यांच्यासह अन्य एकाविरुद्ध तक्रार दिली असून, या सर्वांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात्रेत आवाजाच्या भिंती (डीजे) लावायचा नाही असे का म्हणतोस, असे म्हणून संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याच्या मुठीने मारहाण केल्याचे सूरज दळवीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्या आत्या व मामा यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे सूरजने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस जमादार संजय खाडे व तृप्ती वीर करीत आहेत.