सांगली : ढवळी (ता. वाळवा) येथील बाळूमामा मंदिरात जिवंत नागाची पूजा करण्यात येत असल्याची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने हालचाली करून पुजार्‍यासह नाग ताब्यात घेतला. न्यायालयाच्या आदेशाने नागाची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांनी गुरूवारी दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी ढवळीतील बाळूमामा मंदिरात पुजारी जितेंद्र उर्फ विशाल बबन पाटील हा जिवंत नागाची पूजा करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाच्या पथकाने तात्काळ मंदिरात धाव घेतली असता पुजारी पाटील हा नाग घेउन बाहेर पडल्याची माहिती मिळाली. यानंतर वन कर्मचार्‍यांनी ढवळी ते भडकंबे मार्गावर पुजारी पाटील याला  गाठून झडती घेतली असता त्याच्याकडे नाग सर्प आढळला. तात्काळ सर्पासह  त्याला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा >>>साताऱ्यात घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार? रोहित पवारांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “उदयनराजे…”

याबाबत वन गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पाटील याच्याकडून पुन्हा असा प्रकार करणार नाही असे  हमीपत्र घेउन मुक्त करण्यात आले. तर नाग अधिसूचित प्राणी असल्याने न्यायालयात हजर करून न्यायालयाच्या आदेशाने त्यांची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आल्याचे श्री. पारधी यांनी सांगितले.