अलिबाग: रायगड जिल्ह्यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा ६१ हजार १२५ कोटींचा पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पतपुरवठा आराखड्यात १३ हजार कोटींच्या वाढ झाली आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा बैठक नुकतीच अलिबाग येथे पार पडली. या बैठकीला बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत ६१ हजार २२५ कोटींच्या पतपुरवठा आराखड्याला मंजूरी देण्यात आली. ज्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी २ हजार २२५ कोटी, प्राथमिकता क्षेत्रासाठी १० हजार १२५ कोटी तर अप्राथमिकता क्षेत्रासाठी ५१ हजार कोटींचे उद्दीष्टांचा समावेश आहे. बँकानी समन्वय राखून काम करावे, कृषी विभागातील कर्ज वितरणाचे शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय कुलकर्णी यांनी गेल्या आर्थिक वर्षातील पतपुरवठ्याचा आढावा सादर केला. २०२४-२५ या वर्षासाठी ४७ हजार कोटींच्या पतपुरवठ्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यात कृषी क्षेत्रासाठी १ हजार ७५० कोटी रुपयांचे उद्दीष्ट असताना बँकानी २ हजार ०६५ कोटी (११८ %)तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी ५ हजार १०० कोटी रुपये उद्दीष्ट असताना, ५ हजार ३४७ (१०५%)तर पीक कर्जासाठी ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले असताना बँकानी ४०० कोटी (८९ %) साध्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर मुद्रा अन्तर्गत जिल्ह्यामध्ये ७३४ कोटी कर्ज वाटप करण्यात आल्याचे सांगतले. प्राथमिकता क्षेत्रासाठी ८ हजार ८०० कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट असताना बँकानी ९ हजार ३४२ कोटी (१०६%)कर्ज वाटप झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व बँकांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, सर्व बँकांचा आणि सरकारी विभागांचा योग्य समन्वय असल्याने मोठे उदिष्ट ही साध्य करता येते. असाच समन्वय आणि परस्पर सहकार्य या आर्थिक वर्षात सुद्धा पुढे चालू ठेवा असे आवाहन जिल्हाधिकारी

किशन जावळे यांनी केले. किसान क्रेडिट कार्डसाठी असणारे ६२५ कोटी उद्दिष्ट पूर्ण करा, मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याला प्राधान्य द्या, शासकीय योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीला, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा विकास यंत्रणांच्या प्रकल्पाधिकारी प्रियदर्शनी मोरे, बँक ऑफ इंडिया रायगड विभागाच्या विभाग प्रमुख दीपंविता सहानी भारतीय रिझर्व बँकच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभागाचे व्यवस्थापक विशाल गोंडखे , नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रदीप अपसुंदे, जिल्हा निबंधक प्रमोद जगताप, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी एस हरळय्या, तसेच विविध विभाग व महामंडळाचे अधिकारी, बँकांचे जिल्हा समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित होते.