शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांविषयी एक मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा मोठा गट अस्वस्थ आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या आरोपाला एकनाथ शिंदे यांच्याकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसंच हा दावा केला आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

माझ्या कानावर आलं आहे की एकनाथ शिंदेंसोबतचा एक मोठा गट अस्वस्थ आहे. काहीतरी गडबड आहे. ही गडबड नेमकी काय? ते लक्षात येईलच काही दिवसात. त्यामुळेच हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्येला गेले नव्हते. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अयोध्येत दर्शन घेण्यापेक्षा शक्तीप्रदर्शनाचा जास्त विषय होता. शक्ती प्रदर्शन करायला अयोध्या कशाला हवी? तुमच्यासोबत जे गुंड होते त्यांना काय शुद्ध करायला शरयू नदीच्या किनारी घेऊन गेला होतात का असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.

दीपक केसरकर यांनी काय उत्तर दिलं आहे?

९ तारखेला माझे अनेक कार्यक्रम होते. अयोध्या दौरा तरीही ठरला होता. मी ते कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अटेंड केले. असे अनेकांचे कार्यक्रम असतात, कुणाच्या घरी लग्नं असतात. त्याचा संबंध थेट नाराजीशी कसा काय जोडू शकतात? हे काही मला कळत नाही. निगेटिव्ह चर्चा जे करत आहेत त्यांना करू द्या असं म्हणत संजय राऊत यांच्या दाव्याला दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देऊन काय म्हणाले संजय राऊत ?

“एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. गद्दारांना रस्त्यावर पकडून मारलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर गद्दारांविरोधात लढले. बाळासाहेबांचा हा विचार राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० गद्दार आमदारांना आहे, त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.