रायगड जिल्हा मिनीडोअर चालकमालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केलेला आत्मदहनाचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला. पोलीसांनी हस्तक्षेप करत विजय पाटील यांच्या ताब्यातील रॉकेलची ह़ॉट वॉटर बॅग आणि काडीपेटी ताब्यात घेतली. यानंतर मात्र विजय पाटील यांनी आत्मदहनाचा विचार सोडून प्रशासनाशी चर्चा करण्याची भुमिका स्विकारली. दरम्यान सहा आसनी रिक्षा चालकांच्या प्रश्नासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी पाटील यांना दिले.
सहा आसनी रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यासाठी बैठक रायगड जिल्हा मिनिडोअर चालक मालक संघटना शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. मात्र या प्रश्नावर तोडगा निघू शकलेला नाही. मिनिडोअर चालक मालक संघटनेच्या बहुतांश मागण्या या धोरणात्मक असल्याने त्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दालनात या संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी विजय पाटील यांनी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने ही बैठक होत नव्हती. त्यामुळे विजय पाटील यांनी प्रशासनाला रक्ताने पत्र लिहीत १६ मार्च रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार सकाळी अकरावाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रिक्षाचालक मोठ्या संख्येनी जमा होण्यास सुरवात झाली होती. रिक्षा बंद ठेऊन शेकडो रिक्षा चालक अलिबाग येथे दाखल झाले होते. त्यांनी हिराकोट तलाव परिसरातील रस्ता अडवून धरला होता. प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती. विजय पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा लक्षात घेऊन पोलीसांनी खबरदारी घेतली होती. सकाळपासून पुरेसा पोलीस बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तैनात ठेवण्यात आला होता. सुरवातीला विजय पाटील अज्ञात वासात गेले असून त्यांचा संपर्क होत नसल्याचे सांगितले जात होते. मात्र साडेबारा नंतर मोर्चेकरांच्या हालचालींना वेग आला. पोलीस दलही सतर्क होते. विजय पाटील धोतर सदरा घातलेल्या पेहरावात तोंडाला मास्क लाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाले. गरम पाण्याच्या पिशवीत त्यांनी रॉकेल भरून आणले होते. हे रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न करत असतांनाच पोलीसांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या हातातील रॉकेल भरलेली गरम पाण्याची रबरी पिशवी आणि कागदपत्र काडीपेटी हिस्कावून घेतली आणि विजय पाटील यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी झालेल्या झटापटीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मग मात्र विजय पाटील यांनी प्रशासनाशी चर्चा करण्याची भुमिका घेतली. जिल्हाधिकारी खाली चर्चेसाठी यावे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांवर हप्तेखोरीचे आरोपही केले गेले. यानंतर दहा जणांच्या शिष्टमंडळाला निवासी उपजिल्हाधिकारी बैनाडे यांच्याकडे बोलविण्यात आले. शिष्टमंडळ दाखल होताच, बैनाडे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात १७ मार्च रोजी आयोजित बैठकीचे पत्र विजय पाटील यांना दिले. यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु असलेल्या या आंदोलनाचा समारोप झाला. प्रलंबित मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या दालनात काय निर्णय होणार हे उद्या होणाऱ्या बैठकीत स्पष्ट होणार आहे.
मिनीडोअर चालकमालक संघटनेच्या मागण्या
जुन्या परमिटवरील तीनचाकी व सहाआसनी वाहने स्क्रॅपमध्ये गेल्यावर चारचाकी, सहाआसनी बदली वाहनास सीएनजी कीट बसवण्यास परवानगी द्यावी, रायगड जिल्हयातील एमएमआर क्षेत्रात २० वर्षे तर ग्रामीण भागात २५ वर्षे वाहनांची वयोमर्यादा आहे. या वयोमर्यादेत केवळ २ वर्षांची वाढ करावी, कोरोना काळात दोन वर्षे व्यवसाय बंद होता . तेव्हा विवि धा शासकीय कर, विमा हप्ते यात कुठलीही माफी किंवा सवलत देण्यात आली नाही त्यामुळे २ वर्षे वयोमर्यादेत वाढ करावी,कोरोना काळात जाहीर केलेले प्रतिरिक्षा १५०० रूपये सानुग्रह अनुदान मिळावे, करभरणा करताना विलंब झाल्यास चक्रवाढ व्याज न आकारता सुट मिळावी , मागेल त्याला टॅक्सी ऑनलाइन परवाने बंद करावेत .