प्रदीप नणंदकर

शिक्षण, शेती आणि व्यापार-उद्योग या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती केलेले फार कमी जिल्हे आहेत. यामध्ये आपल्याला लातूरचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मराठवाडय़ात औरंगाबाद, नांदेडनंतर लातूर आपला वेगळा ठसा उमटवित आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनानंतर निर्माण झालेल्या लातूरने विकासाच्या दिशेने अतिशय वेगाने वाटचाल केली. विलासराव देशमुख व शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे दोन माजी मुख्यमंत्री जिल्ह्याने दिले, तर शिवराज पाटील चाकूरकरांनी केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंत मजल मारली. जिल्हा छोटा असला तरी त्याने आपल्या कर्तृत्वाने राज्याला दखल घ्यायला लावली. शैक्षणिक क्षेत्रात शाळा, महाविद्यालयांनी गेली ४० वर्षे कठोर मेहनत घेतली. लातूरचे विद्यार्थी दहावी, बारावी परीक्षांमध्ये चमकत असत. याबाबत अनेक शंका घेतल्या गेल्या. मात्र, त्यांचे निरसन करत लातूरने शिक्षणातील गुणवत्ता कायम राखली. वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षांमध्ये अनेक बदल झाले. त्यानंतरही आपल्यात बदल घडवत लातूरने आपला क्रमांक अव्वलच ठेवला. संपूर्ण देशभरात सर्वाधिक डॉक्टर व इंजिनीयर पुरवणारे गाव म्हणून लातूरची ओळख आहे.

कृषीक्षेत्राची भरारी
लातूरची शेती आपला वेगळा ठसा उमटविणारी आहे. जिल्ह्यात प्रारंभी भुईमूग, त्यानंतर सूर्यफूल व आता गेल्या काही वर्षांत सोयाबीन हे प्रमुख पीक घेतले जाते. प्रत्येक वेळेस लातूरने आपल्या मेहनतीतून शेतीच्या उत्पादनात नाव कमावले. भुईमूग, सूर्यफूलानंतर देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. तूर, हरभरा या दोन पिकाच्या उत्पादनातही लातूरने आपला दबदबा निर्माण केला आहे. लातूरची द्राक्षेही विदेशात अन्य द्राक्षांच्या तुलनेने चढय़ा भावाने विकली जातात. लातूरचा आंबाही चांगलाच भाव खात असून केशर लागवडीत चांगलीच मजल मारली आहे. उसाचे क्षेत्र हे आता चांगलेच जोम धरून ते स्थिरावले आहे. गेल्या काही वर्षांत सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग, विशेषत: खाद्यतेल उत्पादन वाढले आहे. लातूरच्या बाजारपेठेतील भाव पाहूनच देशातल्या खाद्यतेलाचे भाव ठरवले जातात. कीर्ती उद्योग समूहाने आपला चांगला जम बसवला आहे. डाळमिलचे गाव म्हणूनही लातूरने आपली ओळख टिकवली असून तूर व हरभरा डाळींचे भाव लातूरच्या बाजारपेठेवर अवलंबून असतात. देशातील सर्व प्रांतात डाळी पाठवणारा जिल्हा म्हणूनही लातूरची ओळख आहे. जिल्ह्यात डझनभर साखर कारखाने कार्यरत आहेत. लातूरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही राज्यात सर्वच निकषात आघाडीवर आहे.

शिक्षणाची वेगळी वाट
दहावी-बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक यश मिळवणारे गाव म्हणून लातूरची गेल्या अनेक दशकांपासूनची ओळख. परीक्षेमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली तरी लातूरने आपली ही ओळख जाणीवपूर्वक जोपासली आहे. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थी आपले आयुष्य घडवण्याचा पाया म्हणून लातूरकडे पाहतात. त्यातूनच डॉक्टर, अभियंते तयार करणारे गाव अशी लातूरची ओळख निर्माण झाली व ती आता देशाचाच नव्हे तर जगाच्या नकाशावर आली आहे. महाविद्यालयाबरोबरच शिकवणी वर्गानेही यात आपले योगदान दिले आहे.

आरोग्य, उद्योगात ठसा
करोनाच्या काळात अनंत अडचणींना सर्वाना सामना करावा लागला. तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा सक्षम व्हाव्यात यासाठी अतिशय चांगली मेहनत घेतली. त्यातूनच करोना चाचणी केंद्रांची संख्या वाढली. संपूर्ण देशात रेल्वे कोच तयार करणारी चारच केंद्रे आहेत. त्यात लातूरचाही समावेश झाला आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला. रेल्वे कोच फॅक्टरी उभारली. मात्र, पुढे काम मार्गी लागत नव्हते. आता नव्याने केंद्र सरकारने वंदे भारत एक्सप्रेसला लागणारे कोचेस लातूरच्या मराठवाडा रेल्वे फॅक्टरीत उभारण्याचे करण्याचे ठरवले आहे. पहिल्या टप्प्यात वर्षांला १२० डबे तयार होणार आहेत. यामुळे औद्योगिक क्षेत्राला वेगळे वळण मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने लातूरहून पुणे, मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद अशा शहरांना जोडणारे रस्ते उभे राहिले. त्यातून रस्त्याचे मोठे जाळे उभे राहिले आहे. एकेकाळी शिक्षणाच्या क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा होती. आता मात्र अन्य अनेक क्षेत्रांमध्ये जिल्ह्याने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. सर्वागीण विकासाचा हा लातूर पॅटर्न अन्य जिल्ह्यांनी अभ्यासावा असाच आहे.

संकटांशी यशस्वी झुंज
१९९३मध्ये महाभयानक भूकंपाचे संकट जिल्ह्यावर कोसळले. त्यावर मात करत लातूर पुन्हा उभे राहिले. दुष्काळ तर जणू जिल्ह्याच्या पाचवीलाच पुजलेला.. १९७२नंतर दर चार वर्षांनी लातूरला दुष्काळाशी सामना करावा लागला. २०१५ साली रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यानंतर जलयुक्त शिवार योजनेमध्ये पहिला क्रमांक पटकावून लातूरने आपले वेगळेपण सिद्ध केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा मोलाचा पाठिंबा लाभला. लातूर शहरानेही पाण्याच्या प्रश्नावर लोकसहभागातून मात केली. मांजरा नदीचे खोलीकरण झाले. पाणी प्रश्नावर मात करण्याचा हा वेगळा पॅटर्न लातूरने निर्माण केला.

कमतरता काय ?
जिल्ह्यातील शिक्षणाबद्दलचा नावलौकिक देशभर गाजला असला तरी तो मर्यादित विभागापुरताच आहे. खास करून अकरावी, बारावी. मात्र, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा राज्याच्या तुलनेत कमी आहेत. लातूर जिल्ह्यात एक शासकीय महाविद्यालय व एक खासगी वैद्यकीय महाविद्यालय आहे. दिसणाऱ्या सुविधा मोठय़ा असल्या तरी अजूनही आरोग्य सुविधेचे प्रमाण कमी आहे. जिल्हा रुग्णालयासाठीची इमारत अद्यापही नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही राज्याच्या मानाने स्थिती बरी नाही. विमानतळ उभे असले तरी विमान सेवा सुरू नाही. पाण्याच्या प्रश्नाची सतत टांगती तलवार असल्यामुळे उद्योग व अन्य व्यवसायाला अडचणी येतात.

जिल्हा: लातूर
क्षेत्रफळ :७,१५७चौ. किमी.
लोकसंख्या :२४,५४,१९६

मुख्य प्रायोजक : सारस्वत को. ऑप़ बँक लिमिटेड
पॉवर्ड बाय : सिडको, यूपीएल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.)
नॉलेज पार्टनर : गोखले इन्स्टिटय़ूट, पुणे