सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दरडी कोसळून, पुराच्या पाण्यामुळे व अतिवृष्टीमुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या ३७ वर पोहचली आहे. तर, पाच जण अद्यापह बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मदतकार्य, शोध मोहीम व बचाव कार्य सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यात मागील काही दिवसांमध्ये पावसाने अक्षरशा थैमान घातलं आहे. यामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये कित्येकांना जीव गमावावा लागला. अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अनेकजणांचे नातलग अद्यापही बेपत्ता आहेत. तर, आजही अनेक गावं व शहरांना पुराने वेढा दिलेला असल्याने, तेथील नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दरड कोसळलेल्या अनेक ठिकाणी अद्यापही मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कोकण, चिपळूण, महाड, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी ठिकाणी बसल्याचे दिसत आहे.

सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील भूस्खलनामुळे २६ जण, छत पडून १ जण, दोन जण दरड कोसळल्यामुळे तर आठ जणांचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. असा एकूण ३७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. वाई तालुक्यातील ३ जण, जावली तालुक्यातील ४ जण, पाटण तालुक्यातील २७ जण, सातारा तालुक्यातील २ जण, तर महाबळेश्वर तालुक्यातील १ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.

वाई तालुक्यातील कोंढावळे येथील दोन महिलांचा भूस्खलनामुळे, तर एका पुरुषाचा छत पडून मृत्यू झाला आहे. जावली तालुक्यातील रेंगडी येथील दोन महिला व वाटंबे येथील एका पुरुषाचा तर मेढा येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे.पाटण तालुक्यातील बोंद्री येथील एक पुरुष, जळव येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. मंद्रुळकोळे येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे. आंबेघर तर्फ मरळी येथील ५ पुरुष व ६ महिलांचा तर काहीर येथील एका महिलेचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. रिसवड येथील २ पुरुष व २ महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. मिरगाव येथील ४ पुरुष व ४ महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यु झाला आहे. सातारा तालुक्यातील कुस बु येथील एका महिलेचा व कोंडवे येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एका पुरुषाचा दरड कोसळलयाने मृत्यू झाला आहे.

पाटण तालुक्यातील भुस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचे शोध व बचाव काम सुरु असून अद्यापही अंदाजे एकूण ५ नागरिक बेपत्ता आहेत. तर, जावली व वाई तालुक्यातील प्रत्येकी २ व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले असून, त्यांचा शोध घेण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

साताऱ्यात भूस्खलन दुर्घटनेत मृतांचा आकडा १८ वर

या पार्श्वभूमीवर खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज सातारा जिल्ह्यातील वाई, देवरूखकरवाडी येथील परिस्थितीची पाहणी केली व तेथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांना धीर दिला. तसेच, प्रशासकीय यंत्रणांना सूचना देखील केल्या आहेत.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली सातारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त भागांची पाहणी

याचबरोबर रायगड जिल्ह्यात महाडमधील तळीये गावाती घरांवर दरड कोसळून घडलेल्या भयानक दुर्घटनेत आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तरी अद्यापही तिथे मदतकार्य सुरूच आहे.