सोलापूर: पाहुण्याकडील डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून गावाकडे परत निघालेल्या दोन मोटारींना पाठीमागून एका आयशर मालमोटारीने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला. तर दोन्ही मोटारींतील दहा जण जखमी झाले. सांगोला तालुक्यातील महुद गावाजवळ रात्री हा अपघात झाला. मालमोटारचालकाविरुद्ध सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रियांश सागर व्हनमाने असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बाळाचे नाव आहे.
जखमींमध्ये बाळाची आई ऊर्मिला सागर व्हनमाने (रा. गोरेगाव, मुंबई) हिच्यासह राजेंद्र तुकाराम केसकर, सोनाली दादा भानवसे, विनायक भारत लवटे, विमल भारत लवटे, ललिता विलास केसकर, अथर्व दादा लवटे, पूजा राहुल ढोले, नंदा दिलीप बंडगर, वैशाली नेताजी लवटे यांचा समावेश आहे. त्यांना पंढरपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात नेताजी मधुकर लवटे (रा. केसकरवाडी, महूद, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पुतणी वर्षा रोहन जानकर हिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम वाकी शिवणे येथे पाहुण्यांच्या घरी आयोजिला होता. त्यासाठी निकटचे नातलग दोन मोटारींतून तेथे गेले होते.
कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा सर्वजण महूद गावाकडे निघाले असता, महूदच्या अलीकडे माणिकराव जगन्नाथ पाटील यांच्या घरासमोर रस्त्याकडेला दोन्ही मोटारी काही वेळेसाठी थांबविण्यात आल्या होत्या. परंतु पाठीमागून भरधाव आलेल्या आयशर मालमोटारीने प्रथम एका मोटारीला जोरात ठोकरले. ही मोटार समोरील दुसऱ्या मोटारीवर आदळली आणि हा अपघात झाला. सुदैवाने जिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता, ती वर्षा जानकर ही या अपघातात सुखरूप बचावली.