अहिल्यानगर: नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव फाट्याजवळ (ता. पारनेर) भरधाव आलिशान मोटारीची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. या संदर्भात सुपे पोलिसांनी चालक सागर सुरेश धस (रा. आष्टी, बीड) याच्यासह आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर हा आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा आहे.

अपघातानंतर सागर धस याला ताब्यात घेण्यात आल्याचे, तसेच तो चालवत असलेली मोटार पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याची माहिती सुपे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली. या संदर्भात मृत नितीन शेळकेचा चुलतभाऊ स्वप्निल पोपट शेळके यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील मृत नितीन शेळके हा जातेगाव फाटा येथे हॉटेल चालवतो. तो दुचाकीवरून (एमएच १६ डीजे ३७६५) जात असताना पुण्याकडून भरधाव येणाऱ्या धस यांच्या मुलाच्या आलिशान मोटारीने (एमएच २३ बीजी २९२९) त्यांना धडक दिली. स्वप्निल शेळके व इतर नातेवाइकांनी जखमी नितीन शेळके याला तातडीने सुपे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे सांगितले. सुपे पोलिसांनी सागर धस याच्यासह सचिन दादासाहेब कोकणे (रा. तवलेवाडी, आष्टी, बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अपघातप्रवण रस्ता

नगर-पुणे रस्ता अनेक ठिकाणी अपघातप्रवण झालेला आहे. व्यावसायिकांची अतिक्रमणे, वाहनांची वर्दळ यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी सुपे परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली होती. मात्र पुन्हा तेथे पुन्हा अतिक्रमणे झाली आहेत. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नगर-पुणे अंतर अडीच-तीन तासांचे असताना त्यासाठी पाच तास वेळ लागतो आहे. या रस्त्यावरील कामरगाव, जातेगाव फाटा, न्हावरे फाटा ही अपघात स्थळे बनली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावलेला असतो. मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-नगर-छत्रपती संभाजीनगर रस्ता दोन-तीन मजली करण्याची घोषणा केली, मात्र त्याला पुढे चालना मिळालेली नाही. सध्याच्या पुणे-नगर-छत्रपती संभाजीनगर या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला, मात्र त्यालाही गती मिळालेली नाही.