“‘स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके’ हे धोरण घेऊन पुढे जाणाऱ्यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांनी माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे हे लक्षात ठेवावं,” असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेत इलाहाबादचे कोळी असल्याचा गंभीर आरोप करत सभेतील रिकाम्या खुर्च्यांवरून खिल्ली उडवली. आदित्य ठाकरे बुधवारी (८ फेब्रुवारी) जालना जिल्ह्यातील रामनगर येथे आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, “शिवसेना आणि ठाकरे संपवयाची सुपारी मुख्यमंत्री व गद्दारांनी घेतली, हे त्यांनी त्यांनी जाहीर करावं. मी वरळीतून किंवा ठाणे मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढण्याचे आव्हान केले. मात्र, मुख्यमंत्री म्हणतात मी छोटे आव्हान घेत नाही, तर अजून मोठे आव्हान येऊ दे. मुख्यमंत्री इतका अहंकार पण बरा नव्हे. आम्ही छोटी माणसं असलो, तरी जनतेसाठी जनतेमध्ये राहून काम करतो.”
“त्या सभेत रिकाम्या खुर्च्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला”
“सभा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात. याचवेळी माध्यमांमध्ये वरळी मतदारसंघात कोळी बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात इलाहाबादचे कोळीबांधव दिसतात, अशी बातमी आलीय. त्या सभेत रिकाम्या खुर्च्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला,” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची सभेची खिल्ली उडवली.
“गद्दारांनी महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे”
“गद्दारांनी महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तसेच त्यांनी हिंमत असेल, तर राज्यपाल बदलून दाखवावा, असं आव्हान दिलं.
हेही वाचा : “मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार आणि…”, एकनाथ शिंदेंचं वरळीत वक्तव्य
“उद्धव ठाकरे आणि मी पाठीवर ४० वार घेऊन लढतोय”
“उद्धव ठाकरे आणि मी पाठीवर ४० वार घेऊन लढतोय. शिवसेना आज विरोधात आहे, या आधीही विरोधात होती. मात्र, ती जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहे. शिवसेनेचा जन्मच समाजसेवेसाठी आहे आणि आम्ही सत्तेसाठी नाही, तर सत्यमेवसाठी आहोत,” असंही नमूद केलं.