निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि निवडणूक चिन्ह म्हणून ‘मशाल’ला मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या नवीन नावाला आम्ही अभिमानाने सर्वत्र घेऊन जाऊ. त्या नावात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनादेखील आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या नावाला आम्ही सर्वत्र अभिमानाने घेऊन जाऊ, घरोघरी घेऊन जाऊ. त्या नावात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनादेखील आहे. आम्हाला निवडणूक चिन्ह म्हणून जी धगधगती मशाल मिळाली आहे. ती आम्ही महाराष्ट्रासह देशभरात घेऊन जाऊ. अंधेरीपूर्व निवडणुकीत आमचा मोठ्या मताधिक्यानं विजय होईल, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा- Balasahebanchi Shivsena : शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं

‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव शिंदे गटाला मिळाल्याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे नाव खऱ्या शिवसेनेला मिळालं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव आम्हाला मिळालं आहे. त्यांचे बाळासाहेब नेमके कोणते आहेत? हे आम्हाला माहीत नाहीत. कारण ते कुठूनही काहीही चोरतात आणि घेऊन जातात. त्यांनी आमचं नाव चोरण्याचा प्रयत्न केला, चिन्ह चोरण्याचा प्रयत्न केला, पण असे कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उभी राहील. आम्ही जे काम केलंय ते लोकांसमोर आहे. आम्ही सत्याच्या बाजुने आहोत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- “हा चोरबाजार सुरू आहे…” निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मशाल चिन्हाबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी मशाल आहे. हुतात्मा स्मारकाच्या हाततही मशाल आहे. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र वाचवण्यासाठी जशी धगधगती मशाल हाती घेतली होती, तशीच मशाल आज आमच्या हाती महाराष्ट्र वाचवण्यासाठी आली आहे. गेल्या अडीच तीन महिन्यांपासून आपण पाहत आहोत की, महाराष्ट्रात घटनाबाह्य आणि बेकायदेशीर सरकार आहे. या सरकारला संविधानात कुठेही वैधता नाही. तरीदेखील ते वेगवेगळी कामं करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची सगळी कामं राजकीय आहेत. त्यांना स्वत:ची कोणतीही ओळख नाही. खोके सरकार हीच त्यांची ओळख आहे. त्यामुळे ते आमची ओळख खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्रातील लोकं कधीही त्यांना ती ओळख मिळू देणार नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.