Aaditya Thackeray on MNS Alliance: महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग येताना दिसून येत आहे. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेते महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतमीमध्ये महाराष्ट्र हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची साद घातली होती. उद्धव ठाकरेंनी या आवाहानाला प्रतिसाद दिला होता. मात्र या संभाव्य युतीवर पुढे ठोस अशी चर्चा होताना दिसली नाही. आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतेच या विषयावर भाष्य केले.

छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कुणी स्वच्छ मनाने पुढे येतील, त्यांना घेऊन पुढे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. हे उद्धव साहेबांनी सांगितले होते.”

आम्ही सेटिंगचे राजकारण करणार नाही

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “साद-प्रतिसाद, टाळी, दुसरी टाळी हे सर्व चालूच असते. पण आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे बोलत आहोत. आम्ही कुठेही सेटिंगचे राजकारण करणार नाही. आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येत आहोत. जे कुणी आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन पुढे जाऊ. हे कोणत्याही एका पक्षाबाबत बोलत नाही.”

महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याची अवस्था आज बिकट झाली आहे. निवडणुकीपूर्वी जी वचने दिली होती. ती पूर्ण केलेली नाहीत. सरकारमधील तीनही पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. हे वाद जनतेसाठी नसून कुणाला बंगला, कुणाला पालकमंत्री हवे आहे, यासाठी वाद सुरू आहे. महाराष्ट्र हिताची एकही गोष्ट तीनही पक्षाचे नेते बोलत नाहीत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.