महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रत्नागिरीतल्या खेड येथे सभा झाली. काही दिवसांपूर्वी खेडमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील मोठी सभा झली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दीदेखील जमली होती. दरम्यान, उद्धव यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिंदेंची सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु या सभेला फार गर्दी झाली नाही, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते करत आहेत.
“एकनाथ शिंदे यांच्या सभेला लोकांपेक्षा खुर्च्याच जास्त असतात” असा टोला अनेकदा आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. शिंदेंच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडीओदेखील अनेकदा समोर आले आहेत. दरम्यान, यावरून आज पुन्हा एकदा आदित्य यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्यांचे मुख्यमंत्री आहेत, जनतेचे नाहीत.”
हे ही वाचा >> ऑफिसमध्ये ओसामा बिन लादेनचा फोटो लावणं पडलं महागात; विद्युत विभागाच्या अभियंत्याने गमावली नोकरी
इथे राजकीय भाष्य करणार नाही : आदित्य ठाकरे
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी आदित्य म्हणाले की, “मी आज काहीही राजकीय बोलणार नाही. सण-समारंभानिमित्त इथे आलो आहे, अशा ठिकाणी राजकीय भाष्य करणं हा बालिषपणा ठरेल. काही पक्ष असं करत असतात, पण ते तसेच आहेत, त्याला आपण काही करू शकत नाही. आज या ठिकाणी मी फक्त इतकंच म्हणेण की, सर्वांनी आजचा सण आनंदात साजरा करावा.”