scorecardresearch

Premium

पंकजा मुंडेंना शिंदे गटात घेण्याचा विचार करणार का? अब्दुल सत्तार म्हणाले, “एखाद्या नेत्यामुळे…”

पंकजा मुंडे नाराज असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी पंकजा मुंडेंना शिंदे गटात घेणार का असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारला.

Pankaja Munde Abdul Sattar
पंकजा मुंडे व अब्दुल सत्तार

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोदीही माझं राजकारण संपवू शकत नाही, असं विधान केलं. त्यानंतर पुन्हा एकादा त्या नाराज असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच पत्रकारांनी पंकजा मुंडेंना शिंदे गटात घेणार का असा प्रश्न शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विचारला. यावर सत्तार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (२९ सप्टेंबर) जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

अब्दुल सत्तार म्हणाले, “एखाद्या नेत्यामुळे आमच्या दोन्ही पक्षांमध्ये वाद होणार असेल तर नक्कीच तसं होणार नाही. हे भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आहे. भाजपा आमचा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाचं कुठंही नुकसान होणार नाही याची एकनाथ शिंदे पूर्ण काळजी घेतात.”

bharat gogawale
९ आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची गरज नव्हती? भरत गोगावले म्हणाले…
Narayan Rane
“…आता मला जेवण जाणार नाही”, ‘त्या’ प्रश्नावर नारायण राणेंचा संताप
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”
eknath-shinde-and-aditya-thackeray-1
तुम्ही ठाण्यातून निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले…

“मी स्वतः त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो”

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेबाबत केलेल्या दाव्यावर सत्तार म्हणाले, “मी स्वतः त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी अर्जून खोतकर शिवसेनेचे आमदार होते. त्यांनाही विचारून घ्या. आम्ही (काँग्रेसने) शिवसेनेला विनंती गेली होती की, आपण आपली सत्ता स्थापन करू. मात्र, आम्ही बोललो तेव्हा एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी काँग्रेसने त्यांना विनंती केली होती की, आपण आपलं सरकार बनवू.”

“ज्यांना गणित कळत नाही, टोटल कळत नाही तेच असे बोलतात”

चंद्रकांत खैरेंच्या आरोपावरही सत्तार यांनी उत्तर दिलं. “ज्यांना गणित कळत नाही, टोटल कळत नाही तेच असे बोलतात. आमच्याकडे १०० लोकं होती. ते १५ घेऊन आले तर सरकार बनलं असतं का? चंद्रकांत खैरेंना साधा अभ्यास करता येत नाही. सरकार स्थापन करण्यासाठी १४५ संख्याबळ लागतं. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही १०० आमदारही नव्हतो. त्यांचे १५ आमदार घेऊन आम्ही सरकार बनवू शकतो का?”

“लोकं किती वेड्यासारखा आरोप करतात”

“लोकं किती वेड्यासारखा आरोप करतात. या राजकारण्यांवर मला किव येते. मी फार मोठा पुढारी नाही, एक सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु १५ आमदार काय, त्यावेळी २५ आमदार आले असते तरी हे सरकार बनलं नसतं. ५० आमदार आले असते तर त्यावेळी सरकारचा विचार झाला असता,” अशी माहिती सत्तार यांनी दिली.

“काँग्रेसने शिवसेनेला सरकार स्थापन करण्याबाबत विनंती केली होती”

“त्यावेळची परिस्थिती मला चांगली आठवते. आम्ही शिवसेनेला सरकार स्थापन करण्याबाबत विनंती केली होती. मात्र, त्यावेळी एकनाथ शिंदे, अर्जून खोतकर आणि त्यांचे नेते यांनी ते मान्य केलं नाही. मात्र, काँग्रेसकडे तेव्हा एकनाथ शिंदेंचा असा कोणताही प्रस्ताव नव्हता,” असंही त्यांनी नमूद केलं.

“उद्धव ठाकरेंनी CM शिंदेंचं नेतृत्व मान्य करत जुळवून घ्यावं”

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “जे जे ठाकरे गटात आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून शिंदे गटात यावं. आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय नेते म्हणून निवड केली आहे. ते आता राष्ट्रीय नेते आहेत. त्या नेत्याच्या छत्रछायेखाली एका भगव्याखाली यावं.”

हेही वाचा : “शिंदे गटाचे अनेक आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात”, मिटकरींच्या वक्तव्यावर सत्तारांचा जोरदार पलटवार, म्हणाले…

“एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनावर चालत आहेत. त्यांचा आशिर्वाद शिंदेंच्या पाठिशी आहे. जे जे बाहेर असतील त्यांनी एकनाथ शिंदेंना नेता म्हणून मान्य करावं. भविष्यातील शिवसेना एकनाथ शिंदेंची असेल आणि त्यांच्याकडेच धनुष्यबाण चिन्ह असेल,” असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abdul sattar answer on will they take pankaja munde in shinde faction of shivsena rno news pbs

First published on: 29-09-2022 at 20:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×