Abu Azmi On Wari : समाजवादी पक्षाचे मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार अबू आझमी हे कायम त्यांच्या विधानावरून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी औरंगजेबाची स्तुती केल्यावरून आमदार अबू आझमी चांगलेच वादात सापडले होते. त्यानंतर आता अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा चांगलंच राजकारण तापलं आहे. त्यांच्या या विधानावरून अबू आझमी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यानंतर अखेर अबू आझमी यांनी माफी मागितली आहे. पंढरपूर वारीबाबतच्या आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हणत अबू आझमी यांनी मी माझे शब्द मागे घेतो, असं म्हटलं आहे.
अबू आझमी काय म्हणाले?
“सोलापूरमध्ये मी नुकत्याच केलेल्या एका टिप्पणीबाबत पसरलेल्या गैरसमजाबाबत मी स्पष्ट करू इच्छितो की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. त्यामुळे वारकरी समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेतो आणि माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. मी एक निष्ठावंत समाजवादी आहे आणि नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती आणि परंपरांचा आदर करतो. वारीच्या परंपरेचं पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
“ही परंपरा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अभिमानास्पद भाग आहे, ज्याचा मी वैयक्तिकरित्या आदर करतो. मी वारी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या आणि त्यांच्या हक्कांच्या संदर्भात केला होता. ती कोणत्याही प्रकारची तुलना नव्हती आणि माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती. माझा एकमेव उद्देश सरकारचं लक्ष वेधण्याचा होता. त्यांच्या दुटप्पीपणामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ नये की या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास म्हणतात. आम्ही उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी आदरासाठी आणि समानतेसाठी जोरदार लढत राहू, परंतु देशाच्या एकतेशी कधीही तडजोड होऊ देणार नाही”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
हाल ही में सोलापुर में मेरे द्वारा की गई एक टिप्पणी को लेकर जो गलतफहमियाँ फैली हैं, मैं उन्हें स्पष्ट करना चाहता हूँ। मेरे वक्तव्य को तोड़–मरोड़ कर और दुर्भावनापूर्ण ढंग से प्रस्तुत किया गया। यदि इससे वारकरी सम्प्रदाय की धार्मिक भावना आहत हुई हो, तो मैं अपने शब्द पूरी तरह से वापस…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Abu Asim Azmi (@abuasimazmi) June 23, 2025
अबू आझमी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
आमदार अबू आझमी हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सध्या आषाढी यात्रेसाठी सुरू असलेल्या संतांच्या पालख्यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पालखी सोहळ्यामुळे रस्ता जाम होतो. रस्त्यावर हिंदूंचे इतर अनेक सण, उत्सव साजरे होतात. त्याबाबत कोणतीही मुस्लीम व्यक्ती वा संघटना अजिबात आक्षेप घेत नाही. उलट, स्वागत करते. परंतु दुसरीकडे ईद सणात किंवा शुक्रवारी रस्त्यावर एका बाजूने दहा मिनिटांसाठी सामूहिक नमाज पठण केल्यावर त्याविरोधात काहूर माजविला जातो. त्या विरुद्ध प्रतिक्रिया म्हणून रस्त्यावर महाआरती केली जाते, असं अबू आझमी यांनी म्हटलं होतं.