अलिबाग : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला, अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयाने वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हर्षद सुभाष मोकल असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटना २८ जानेवारी २०२० ते २० मार्च २०२० दरम्यान पेण येथे घडली होती. आरोपी याने १४ वर्षी अल्पवयीन मुलीवर तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले होते.
मुलीच्या भावाला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. पीडित मुलीच्या आईला याबाबतची माहिती मिळताच तिने याप्रकरणी आरोपी हर्षद मोकल याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पॉस्को कायद्यातील विविध कलमाअंतर्गत तसेच भादवी ३७६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून याप्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते.
हेही वाचा >>> नवी मुंबई : बेवारस बॅग आणि धावपळ; वाचा नेमका प्रकार काय?
या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश ए. एस राजदेकर यांच्या न्यायालयात झाली. यावेळी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून भूषण साळवी यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान १० जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यात पीडित मुलगी, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, पंच आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सुनावणीदरम्यान पीडित मुलीची मैत्रीण फितूर झाली. पण उलट तपासणीदरम्यान अतिरिक्त सरकारी अभिवक्ता साळवी यांनी सत्य समोर आणले. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अतिरिक्त सरकारी वकील भूषण साळवी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला, आणि आरोपीला वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. यातील २५ हजार रुपयांची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी दिले. गुन्ह्याच्या सुनावणीत पैरवी पोलीस अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.