अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाताली कोटयावधी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली. आरोपी ज्योतिराम पांडुरंग वरुडे यांनी विषारी द्रव्य प्राशन करत जिवन संपवले, मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभाग आणि एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजनेत ४ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार झाल्याची बाब, यावर्षाच्या सुरवातीला समोर आली होती. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

वेतन फरकाच्या रकम दाखवून आरोपी नाना कोरडे यांनी पाणी पुरवठा विभागातील सात कर्मचाऱ्यांच्या नावावर दीड कोटी रुपयांचा अपहार केल्याची बाब लेखा परिक्षणात समोर आली होती. यानंतर कोरडे यापुर्वी कार्यरत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाची खाते निहाय चौकशी करण्यात आली. यात नाना कोरडे, ज्योतिराम वरुडे आणि महेश मांडवकर यांनी ४ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब निदर्शनास आली होती. खातेनिहाय चौकशीनंतर या तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा पासून ज्योतिराम वरुडे हे तणावाखाली होते. 

ज्योतिराम पांडुरंग वरुडे (वय ४८) यांनी अलिबाग जवळील विद्यानगर येथे मेव्हण्याच्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे त्यांना उलटी होऊ लागली व नातेवाईकांनी तातडीने अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत त्यांची पत्नी अश्विनी वरुडे (वय ४७) यांनी अलिबाग पोलीसांना या घटनेची माहिती दिली आहे. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास सुरू आहे. त्यांच्या आत्महत्या मागील कारण स्पष्ट झाले नसले तरी,  मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे . दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे.