कराराची मुदत संपलेल्या सर्व १८ व्यापारी संकुलांतील गाळे जप्ती व थकबाकी वसुलीची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
मात्र पालिकेच्या चार व्यापारी संकुलातील ६०८ गाळ्यांची सुनावणी अद्याप बाकी असल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व व्यापारी संकुलावर एकाच वेळी कारवाई करण्यात येणार आहे.
पालिकेच्या व्यापारी संकुलांतील गाळ्यांच्या कराराची मुदत २०१२ मध्ये संपल्यापासून घोळ सुरू आहे. मनपाच्या मालकीच्या १४ संकुलांतील गाळेधारकांना नोटीस बजावत सुनावणी घेण्यात आली आहे. मात्र त्याचे आदेश अद्याप आयुक्तांनी दिलेले नाहीत. ती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने पालिकेच्या संकुलांवर आधी कारवाई करावी, असे प्रशासनाचे मत होते. मात्र महात्मा फुले, सेंट्रल फुले, वालेचा व शास्त्री टॉवर संकुलातील ६०८ गाळेधारकांची सुनावणी बाकी असल्याने ती आधी पूर्ण करावी. त्यानंतर सर्व संकुलांवर एकाच वेळी कारवाई करावी, असे महापौरांनी सुचविले.
त्यानुसार आता आधी संबंधित संकुलांतील सुनावणी पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर सर्व ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली जाणार आहे.