अहिल्यानगर : एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणारा संतोष धोत्रे व त्याच्या टोळीतील १९ जणांविरुद्ध ‘मोका’अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या टोळीविरुद्ध तब्बल २४ गुन्हे दाखल आहेत.
टोळीप्रमुख संतोष धोत्रे, मट्टस उर्फ अजय सोमनाथ गुळवे, अमोल गोरख आव्हाड, अभिषेक नितीन गायकवाड, विशाल भाऊसाहेब पाटोळे, सुधीर प्रदीप दळवी, राहुल नाथा गोरे, शरद जगन पाटोळे, तुषार लहानू पानसरे, अक्षय बाळासाहेब ठुबे, यश सुनील सरोदे, सुरज अरविंद भिंगारदिवे, करण गौतम अवताडे, आशिष उर्फ पप्पू अंतोन पाटोळे, यश भगवान बुट्टे, शेख मोहम्मद ताहीर मुन्ना, जॅकी उर्फ धीरज आवारे, आदित्य लक्ष्मण जाचक व प्रतीक नवनाथ तागड यांच्याविरुद्ध मोकाअन्वये कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व एमआयडीसी, बोधेगाव, नागापूर व सावेडी उपनगर परिसरात राहतात.
काही दिवसांपूर्वी या टोळीने निंबळक येथे पैशासाठी किराणा दुकान पेटवून दिले. तसेच दरोडा, गावठी कट्ट्याने खुनाचा प्रयत्न, महिलांशी लज्जास्पद वर्तन, खंडणी, सरकारी कामात अडथळा आणणे आदी गुन्हे दाखल आहेत.एमआयडीसी ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी यांनी मोकाअन्वये कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना सादर केला होता. त्यास पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली.