सातारा : मजुरीच्या पैशाची देवाणघेवाण व वाटणीच्या कारणावरून आरोपीने सहकाऱ्यास शिवीगाळ व हाताने मारहाण केली. नंतर सोळशी नदीच्या पात्रात ढकलून दिले. त्यामुळे रंगनाथ विलास पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकणी आरोपी सुनील लिंबाजी माने यास वाई येथील प्रथमवर्ग अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी जन्मठेप व ५०० रुपये दंड, तसेच अन्य कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
आरोपी सुनील लिंबाजी माने, किसन जाधव व रंगनाथ विलास पवार यांच्यामध्ये मजुरीच्या पैशाची देवाणघेवाण व वाटणीच्या कारणावरून तापोळा (ता. महाबळेश्वर) या गावचे हद्दीत भांडणे झाली होती. यामध्ये तापोळा या गावचे हद्दीत आरोपी सुनील माने याने मृत पवार यांना सोळशी नदीच्या पात्रात ढकलून दिले. त्यामुळे रंगनाथ पवार यांचा मृत्यू झाला होता. या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सुनील लिंबाजी माने ( बेघरवस्ती, नागठाणे, ता. जि. सातारा) यांच्या विरुद्ध तपासी अधिकारी, मेढ्याचे पोलीस निरीक्षक एन. एम. राठोड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा पुरावा व इतर साक्षीदार यांच्या साक्षीवरून व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आशीर्वाद कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, वाई आर. एन. मेहेरे यांनी आरोपीस दोषी धरून जन्मठेप व ५०० रुपये दंड, तसेच अन्य कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.