Aditya Thackeray slams Ashish Shelar Comparing Marathi Protest with Pahalgam Terror Attack : “पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या, इथे मनसे आंदोलक निष्पाप हिंदूंना भाषा विचारून मारहाण करीत आहेत” अशा वक्तव्य राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पाठोपाठ भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी देखील मराठी जनतेबद्दल गरळ ओकली आहे. “हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”, अशी पोस्ट दुबे यांनी समाजमाध्यमांवर केली आहे.
उद्धव व राज ठाकरे यांना महाराष्ट्राबाहेर या तुम्हाला आपटून आपटून मारू, अशी धमकी देखील दुबे यांनी दिली आहे. दुबे एवढ्यावरच थांबले नाहीत. तर ते म्हणाले, “तुम्ही टाटा, बिर्ला व रिलायन्सच्या जीवावर जगताय. मराठी माणसाकडे कोणते उद्योगधंदे आहेत?”
“भाजपाने मराठी माणसाची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केली”
शेलार व दुबे यांच्या या वक्तव्यांवर शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. आदित्य यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “भाजपा दररोज त्यांचा महाराष्ट्राप्रतीचा द्वेष या ना त्या मार्गाने ओकत आहे! काल भाजपाने मराठी माणसाची/महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केली, ज्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, तोसुद्धा भाजप सरकारच्या अपयशामुळेच! हल्ल्याला तीन महिले उलटले तरी हे भाजपा सरकार त्या दहशतवाद्यांना पकडण्यात अपयशी ठरलं आहे.
जुनंच ‘फोडा आणि राज्य करा’ धोरण आहे : आदित्य ठाकरे
“आज भाजपाचा तो खासदार, ज्याच्या अय्याश पार्टीसाठी पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी काश्मीरची सुरक्षा वापरली गेली असं आपण सर्वांनी ऐकलं, त्याने महाराष्ट्राबद्दल अश्लाघ्य आणि घृणास्पद वक्तव्य केलं आहे. प्रश्न असा आहे की भाजपा या थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की महाराष्ट्रद्वेष हाच भाजपाचा खरा डीएनए आहे? त्याचं वक्तव्य ऐकून मला जितका राग आणि घृणा वाटली आहे, तितकंच आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की हे सर्व भाजपाचं जुनंच ‘फोडा आणि राज्य करा’ धोरण आहे. खास करून बिहार आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी!”
“महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात असलेल्या द्वेषाशिवाय, भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही. त्यांचा फॅार्म्युला ठरलेला असतो, द्वेष, फूट आणि भांडणं! पुढच्या काही दिवसांत, भाजपा त्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या ‘प्लेबूक’ जाळ्यात अडकू.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आदित्य ठाकरे म्हणाले, “हे भाजपाचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी. पण सावध राहा, हीच भाजपची नीती आहे. जर भाजपाने या दोघांविरोधात कारवाई केली नाही, तर हे स्पष्ट होईल की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे!”