अलिबाग- कर्जत मधून अफ्रिकन ग्रे पॅरेट आणि ब्लू गोल्ड मकाव आणि स्कार्लेट मकाव असे एकूण ९ पक्षी चोरीला गेले होते. गेली दोन महिने पक्षांचा शोध सुरू होता. कर्जत पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत होते. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर सर्व पक्षी तामिळनाडू मधील चेन्नई येथून ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे.
रिवाईल्ड सैंच्युरी चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत कर्जत मधील टेंबरे आंबीवली य़ेथे एका शेतघरात हे पक्षी ठेवण्यात आले होते. यात ७ आफ्रिकन ग्रे पॅरोट, ०१ ब्ल्यू गोल्ड मकाव, ०१ स्कार्लेट मकाव पक्षांचा समावेश होता. पाळी प्राण्यांसारखे हे पक्षी संभाळले जातात. मात्र १७ जुलैला पहाटे दीड वाजता अज्ञात इसमांनी पिंजरे तोडून हे सर्व पक्षी चोरून नेले होते. ज्यांची किंमत १९ लाख २५ हजार येवढी होती. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती.
पाळीव पक्षांच्या चोरीची ही पहिलीच घटना होती. फिर्यादींच्या घरा जवळ लावलेले सिसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने, या घटनेचा तपास करणे आव्हानात्मक झाले होते. मात्र पोलीसांनी अतिशय संवेदनशीलतेनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळाकडे जाणारे आणि येणारे अनेक सिसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्याच बरोबर आसपासच्या परिसरातील नागरीकांशी बोलून संशयास्पद हालचालीबाबतची माहित संकलित करण्यात आली. सिसिटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण करून आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपींची छायाचित्र तयार करून त्यात दिसणारे आरोपीचा शोध सुरू केला.
तपासानंतर सुरवातीलाअनिल रामचंद्र जाधव, वय-१९ वर्षे, रा.वावंढळ, ता. खालापूर याला ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत त्याची सखोल चौकशी करण्यात आली. सुरवातीला तो उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. दुसऱ्या आरोपीची माहिती दिली. यानंतर राजेशसिंग माहि ऊर्फ समशेरसिंग, वय-४३ वर्षे, रा.दादाभैय्या चौक, दिल्ली येथून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी ताब्यात आल्यानंतर पोलीसांनी चोरीला गेलेल्या पक्षांचा शोध सुरु केला. यानंतर चोरीला गेलेले पक्षी तामिळनाडूतील चेन्नई येथून ताब्यात घेण्यात आले.
आफ्रिकन ग्रे पॅरोट याची बुध्दीमत्ता ही ०५ वर्षाच्या मुलाइतकी असते आणि ते लोकांशी संवाद साधतात, त्यामुळे त्यांना पाळीव प्राण्यांसारखे सांभाळतात व ते साधारण ४० वर्षे जगतात. त्यामुळे त्यांची किंमत ही ७५,०००/- रुपये प्रत्येकी इतकी आहे. त्याचप्रमाणे ब्ल्यू गोल्ड मकाव आणि स्कार्लेट मकाव हे पक्षी साधारण ६० ते ७० वर्षे इतके आयुष्य जगतात आणि प्राणी संग्रहालय व पक्षी गृहांमध्ये पाळीव प्राणी म्हणून देखील ठेवले जातात. त्यांच्याकडे खूप चांगला शब्दसंग्रह असून ते नक्कल करु शकतात आणि बोलूही शकतात. त्यामुळे ब्ल्यू गोल्ड मकाव या पक्षाची किंमत २ लाख रुपये तर स्कार्लेट मकाव वा पक्षाची किंमत ही चार लाख रुपये प्रत्येकी अशी असून ते मौल्यवान पक्षी समजले जातात. त्यामुळे आरोपींनी या पक्षांची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या तपासात कर्जतचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले , सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वरोटे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस हवालदार समीर भोईर, स्वप्नील येरुणकर, पोलीस नाईक प्रविण भालेराव, केशव नागरगोजे, विठ्ठल घावस यांनी या गुन्ह्याच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली.
पोलीसांनी हॉटेल, फार्म हाऊस व इतर व्यावसाईक ठिकाणी आवश्यकते नुसार सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून घ्यावेत. त्याचप्रमाणे बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमे-यांचा डि.व्ही. आर. हा सहजासहजी कोणासही दिसून येणार नाही अशा सुरक्षीत ठिकाणी ठेवावेत. तसेच बसविण्यात आलेले सीसीटीव्ही, कॅमेरे हे योग्य पध्दतीने कार्यरत आहेत याची वेळोवेळी खात्री करावी असे आवाहन केले आहे.